नाशिकमध्ये दर तिसर्‍या दिवशी महिला ठरतेय वासनेचा बळी | पुढारी

नाशिकमध्ये दर तिसर्‍या दिवशी महिला ठरतेय वासनेचा बळी

नाशिक : गौरव अहिरे
शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये चालू वर्षात विनयभंग प्रकरणी 39 व बलात्काराचे 18 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार 1 जानेवारी ते 13 मे दरम्यान 133 दिवसांच्या कालावधीत दर तिसर्‍या दिवशी महिला वासनेचा बळी होत आहे. त्यामध्ये 16 अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. विनयभंग, बलात्कार करणार्‍यांमध्ये बहुतांश आरोपी हे पीडितेच्या ओळखीतील किंवा नातेसंबंधातील आहेत.

सातपूर येथील एका पीडितेच्या भावाच्या ओळखीतील तिघांनी घरात बळजबरीने शिरून पीडितेचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि.13) घडली. या आधीही सातपूर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने व्यावसायिक महिलेवर अत्याचार केला होता. यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात दाखल गुन्ह्यांनुसार महिलांवर तिच्या ओळखीतीलच पुरुषांनी अत्याचार केले आहेत. त्यात प्रेमाचे-विवाहाचे आमिष दाखवून विनयभंग, बलात्कार झाले आहेत. तर अल्पवयीन मुला-मुलींवरही त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत आरोपींनी अत्याचार केले आहेत. यातील बहुतांश गुन्हे उघडकीस आले असून, संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक घटनांमध्ये महिलांना रोजच विकृत मानसिकतेच्या पुरुषांचा सामना करावा लागतो. मात्र, त्यांच्याकडून विरोध होत नसल्याने किंवा विरोध केला तरी आरोपी त्यास जुमानत नसल्याने महिला त्रस्त होत असल्याचे बोलले जाते. पोलिसांकडून निर्भया पथक, महिला सुरक्षा पथक नेमले असून, त्यांच्याकडूनही अनेक तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, मध्यंतरी निर्भया पथक काहीसे निष्क्रिय झाल्याचे पाहावयास मिळाले होते.

महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी

पती, सासरच्यांकडून होणार्‍या छळालाही महिला बळी पडत आहेत. चालू वर्षात सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी 26 विवाहितांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्याचप्रमाणे काही विवाहितांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत.

हेही वाचा :

Back to top button