नाशिक : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार | पुढारी

नाशिक : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.14) दिवसभरात हे अपघात झाले. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अक्षय नंदू बस्ते (20, रा. शिंदवड, ता. दिंडोरी) हा युवक एमएच 15, ईके 3817 क्रमांकाच्या दुचाकीवरून शनिवारी मध्यरात्री म्हसरूळ गावातून जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. अक्षयने डोक्यात हेल्मेट घातलेले होते. मात्र, वाहनाने धडक दिल्यानंतर हेल्मेटचा बेल्ट तुटून हेल्मेट पडले. त्यामुळे त्याच्या डोक्यास गंंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक पसार झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नितीन बबलदास पटेल (53) व बिपीन अंबालाल पटेल (55, दोघे रा. काठे गल्ली) हे दोघे शनिवारी सकाळी तिगरानिया रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी एमएच 15, एचजी 0206 क्रमांकाच्या कारचालकाने भरधाव कार चालवून नितीन व बिपीन पटेल यांना धडक दिली. त्यात नितीन यांचा जागीच मृत्यू झाला तर बिपीन पटेल हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी कारचालक अरविंद कुमार शर्मा (रा. समतानगर, टाकळी) याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेत तारा शांताराम कुलकर्णी (64) या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना 7 मे रोजी कॉलेजरोडवर धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या तारा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button