पर्यटक, भाविकांनी कोल्हापूर फुलले | पुढारी

पर्यटक, भाविकांनी कोल्हापूर फुलले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सलग तीन दिवस असलेल्या सुट्ट्यांनी कोल्हापूर शहर पर्यटक, भाविकांनी रविवारी अक्षरश: फुलून गेले होते. शहरातील प्रमुख रस्ते उशिरापर्यंत गजबजून गेले होते. अंबाबाई आणि जोतिबा मंदिरांत दर्शनासाठी दिवसभर रांगा होत्या. दिवसभरात शहराच्या बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली.

शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यातच शनिवारपासून सोमवारपर्यंत तीन दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. यामुळे लोक सहकुटुंब पर्यटन, दर्शनासाठी येत आहेत. पहाटेपासूनच पर्यटक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत होते. शहराकडे येणार्‍या रस्त्यांवर सकाळपासूनच पर्यटक, भाविकांची वाहने दिसत होती.

एस.टी. बससह रेल्वे आणि विमानानेही दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे बसस्थानकही प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले होते. दुपारी दीड आणि साडेचार वाजता आलेल्या महाराष्ट्र आणि हरिप्रिया एक्स्प्रेसमुळे रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी होती. तिरुपतीहून आलेले भाविक रिक्षा, बस किंवा अगदी थेट चालत अंबाबाई मंदिराच्या परिसरातच येत होते. यामुळे दुपारी स्टेशनरोड तसेच भाऊसिंगजी रोडवर तिरुपतीहून आलेल्या भाविकांचीही गर्दी जाणवत होती.

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सकाळपासूच गर्दी झाली होती. रखरखत्या उन्हातही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दर्शन मंडपाशेजारी ठेवलेल्या पायघड्या वारंवार पाण्याने भिजवल्या जात होत्या. उन्हाच्या तडाख्यामुळे दर्शन मंडपाबाहेर गर्दी होताच भाविक मुखदर्शनासाठी जात होते. ऊन कमी झाल्यानंतर सायंकाळनंतर मंडपाच्या बाहेरही दर्शन रांग लागली होती. रांगेत उभे राहिल्यानंतर सकाळी अर्धा ते पाऊण तासात दर्शन होत होते. दुपारी गर्दी वाढल्याने दर्शनाचा वेगही कमी झाला होता. यामुळे सुमारे तास ते दीड तासाने दर्शन होत होते.

भाविक दर्शन घेऊन मंदिराबाहेर आल्यानंतर महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड, चप्पल लाईन आदी परिसरात खरेदीसाठी जात होते. यामुळे सकाळपासून बाजारपेठांत गर्दी होती. सकाळी नाष्ट्यासाठी तसेच दुपारी बहुतांशी हॉटेल पर्यटक, भाविकांनी फुल्ल झाल्याचे चित्र होते. खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांसह स्टॉलवरही भाविक, पर्यटकांची गर्दी होती. अंबाबाई मंदिरासह तुळजाभवानी मंदिरातही भाविक दर्शनासाठी जात होते. दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरातही सकाळपासून रांगा होत्या. न्यू पॅलेस, रंकाळा चौपाटीवरही पर्यटकांची दिवसभर गर्दी होती. सायंकाळनंतर स्थानिक आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांमुळे रंकाळा उद्यानाला गर्दीचा बहर आला होता. पंचगंगा नदीघाटावरही भाविक, पर्यटकांची संख्या पहाटेपासूनच होती. कणेरी मठासह पन्हाळा, राधानगरी परिसरातही पर्यटकांची मोठी गर्दी होती.

चार दिवसांत तीन लाखांवर पर्यटक

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत सुमारे तीन लाखांवर पर्यटक, भाविक आले होते. रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत 64 हजार 220 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. चार दिवसांत अंबाबाई मंदिरात दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या 2 लाख 12 हजार इतकी नोंद झाली आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक भाविकांची संख्या होती. यासह शहरात, जिल्ह्यात अन्य ठिकाणी भेट देणारेही भाविक आहेत. यामुळे चार दिवसांतील भाविक, पर्यटकांची संख्या तीन लाखांवर असल्याचे सांगण्यात आले.

छोट्या-मोठ्या व्यवसायांना चालना

कोल्हापूर शहरात रविवारी पर्यटक आणि भाविकांमुळे विविध प्रकारची सुमारे 80 लाखांवर उलाढाल झाली. गेल्या चार दिवसांत हीच उलाढाल दोन ते तीन कोटींपेक्षा जास्त असू शकते, असेही सांगण्यात आले.

Back to top button