धुळे : विहिरीचा भराव ढासाळल्याने गाडले जाऊन माय-लेकाचा मृत्यू, गावावर शोककळा - पुढारी

धुळे : विहिरीचा भराव ढासाळल्याने गाडले जाऊन माय-लेकाचा मृत्यू, गावावर शोककळा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

विहिरीचे बांधकाम ढासाळल्याने गाळात गाडले जाऊन मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील मोरशेवडी गावात घडली आहे. या घटनेमुळे मोरशेवडी गावावर शोककळा पसरली असून तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तब्बल २० तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

नांदगाव तालुक्यातील साकुरी नजीक असणाऱ्या डोंगरी येथे राहणारे सुनिता भिका पवार (वय 39) या पती भिका पवार आणि त्यांचा मुलगा शाम भिका पवार (वय १०) यांच्यासह हे धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे माहेरी दिलीप जाधव यांना भेटण्यासाठी आले होते. जाधव यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीच्या कठड्याचे काम करण्यात आले होते. या विहिरीत सुमारे सात फूट पाणी लागलेले होते. त्यामुळे सुनीताबाई या त्यांच्या मुलासह जाधव यांच्या शेतातील विहीर पहाण्यासाठी गेल्या. ही विहीर कठड्यावर रेलून पाहत असताना अचानक कठडा तोडून विहिरीचा मोठा भाग कोसळला. यात मातीच्या ढिगाऱ्याखाली सुनीताबाई आणि शाम हे पूर्णपणे गाडले गेले. तर भिका पवार हे विहिरीत गळ्यापर्यंत गाळात रुतून बसले. ही घटना घडताच जाधव यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी लोकांना बोलावले. शेतातील नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र गाळा मधून त्यांना बाहेर काढणे शक्य होत नसल्याने ही माहिती तालुका पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे पथकासह मोरशेवडी गावात पोहोचले. तत्पूर्वी शिंदे यांनी पोखलँड यंत्राला पाचारण केले. मात्र यंत्र विहिरीजवळ पोहोचल्यानंतर अचानक यंत्र बंद झाल्याने पुन्हा संकट निर्माण झाले.

रात्री उशिरा खोदकाम करून भिका पवार यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पण अंधार असल्याने व सुनीताबाई या जिवंत असल्याची आशा पाहून माती उकरणे सुरू ठेवण्यात आले. अखेर दुपारी उशिरा जळगाव येथून आणलेल्या यंत्राच्या मदतीने सुनीताबाई आणि श्याम पवार यांना मृतावस्थेत विहिरीच्या गाळातून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी भिका पवार यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात पथकाला यश आले. या कामासाठी तब्बल २० तास गावकरी व पोलीस पथकाचे मदतकार्य सुरू होते. या घटनेमुळे डोंगरी गावासह मोरशेवडी गावावर शोककळा पसरली आहे. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button