नाशिक : तीन वर्षांपासून कुटुंब जगतंय बिबट्याच्या दहशतीत, अनेकवेळा झाले हल्ले - पुढारी

नाशिक : तीन वर्षांपासून कुटुंब जगतंय बिबट्याच्या दहशतीत, अनेकवेळा झाले हल्ले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2019 पासून बिबट्याचे एकाच कुटुंबाला वारंवार होणारे दर्शन, बिबट्याने पाळीव प्राण्यांसह कुटुंबीयांवर हल्ले होण्याचे प्रकार सन 2022 मध्येही सुरूच आहेत. मात्र, वनविभागाने या परिवाराच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने तसेच येथे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना न केल्याने बिबट्याच्या हल्ल्यापासून कधी संरक्षण मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

देवळाली कॅम्प भागातील लॅम रोड परिसरात जमाल सॅनिटोरिअम आहे. येथे उन्हवणे परिवाराचे 2019 सालापासून वास्तव्य आहे. वडिलोपार्जित जागेत राहणारी सध्या पाचवी पिढी येथे स्थायिक झालेली आहे. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत बिबट्याचे दर्शन, हल्ले सुरूच असल्याने उन्हवणे परिवार दररोज दहशतीखाली वास्तव्य करीत असल्याचे कुटुंबीयांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. बिबट्याने नुकताच या वस्तीवर हल्ला केला. त्यात पाळलेला कुत्रा बिबट्याने फस्त केला. त्यामुळे वनविभागाने दोन दिवसांनंतर येथे तात्पुरता पिंजरा लावला आहे. मात्र, यापूर्वी उन्हवणे कुटुंबातील बादल आणि रूपाली या भावंडांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत. सुदैवाने या दोघांनी बिबट्याला पिटाळून लावले असले, तरी त्यांच्या जखमा मात्र आजूनही ताज्याच आहेत.

याबाबत रूपाली सुरेश उन्हवणे यांनी संगितले की, बादल सुरेश उन्हवणे हा माझा भाऊ. त्याच्यावर बिबट्याने 23 डिसेंबर 2019 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पहिला हल्ला केला. त्यानंतर त्याच्यावर अजून दोन हल्ले झाले. त्यामध्येही त्याला जखमा झाल्या. सुदैवाने त्याचा जीव वाचला. माझ्यावरही दोन हल्ले झाले. त्यामध्ये मी जखमी झाले. त्याचबरोबर 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाघसदृश प्राण्याने हल्ला करून आम्ही पाळलेल्या बकरीला जिवे ठार मारले. त्यानंतर दि. 10 मे 2022 रोजी आमच्या कुत्र्यावर वाघासारख्या दिसणार्‍या प्राण्याने हल्ला केला. त्यात कुत्र्याचा जीव गेला.

हिंस्र पाण्यांच्या हल्ल्यांपासून मुक्त करावे
वाघ, बिबट्या म्हटले की, अंगाला घाम फुटतो. आणि त्यांचे हल्ले हे तर आमच्या वस्तीवर वारंवार घडत आहेत, तरीही कॅन्टोन्मेंट, पोलिस, वन विभाग तसेच प्रशासन तक्रार करूनही याबाबत ठोस लक्ष देत नाही. उपाययोजना करत नाही. संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात आमच्यावर बिबट्या किंवा नरभक्षक प्राण्याने हल्ल करून जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण असणार? त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांपासून मुक्त करावे. वनविभागाने कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी बादल आणि रूपाली उन्हवणे यांनी केली आहे.

– रुपाली उन्हवणे, बादल उन्हवणे

हेही वाचा :

Back to top button