सांगलीत गुंडाचा निर्घृण खून; तीन तास मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात - पुढारी

सांगलीत गुंडाचा निर्घृण खून; तीन तास मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड जावेद नूरमहम्मद गवंडी (वय 45) याचा घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. जुना बुधगाव रस्त्यावरील राजीव गांधीनगर झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. कौटुंबिक वादातून मेहुणा तौफीक अल्लाउद्दीन सनदी (32, संजयनगर) याने हा खून केल्याचा संशय आहे. रात्री उशिरा त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

जावेद गवंडी याच्याविरुद्ध शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडीचे 13 गुन्हे दाखल आहेत. तो पत्नी व मुलासोबत राजीव गांधीनगर झोपडपट्टीत राहत होता. चार दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणावरून पत्नी जस्मीनसोबत त्याचा वाद झाला होता. यातून जस्मीन संजयनगर येथे माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी जावेद दुसर्‍यादिवशी लगेच संजयनगर येथे गेला होता. त्यावेळी जस्मीनने येण्यास नकार दिला. यावरून त्याचा मेहुणा तौफीक सनदी याच्याशी त्याचा जोरदार वाद झाला होता.

गुरुवारी जावेद कोयता घेऊन तौफीकला मारण्यासाठी गेला होता. पण तो घरी नव्हता. त्यामुळे जावेद घरी आला. याबाबत तौफीकने जावेदविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता. शुक्रवारी सकाळीही जावेद कोयता घेऊन तौफीकला मारण्यासाठी गेला होता. यावेळी दोघांत जोरदार वाद झाला. दोघांनी ऐकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. दुपारी तीन वाजता जावेद घरी एकटाच होता. त्यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गळ्यावर, मानेवर, पोटावर व डोक्यात वर्मी घाव बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन जावेद जागीच मरण पावला. सायंकाळी साडेपाच वाजता जावेदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे शेजार्‍याने पाहिले. त्याने शहर पोलिसांना याची माहिती दिली.पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संदीप पाटील, मेघराज रुपनर, आर्यन देशिंगकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

जावेदचा मुलगा घटनास्थळी आला होता. पोलिसांनी त्याच्याकडून प्राथमिक माहिती घेतली. त्यावेळी या खुनामागे मेहूणा तौफीक कुरणे याचा हात असल्याची माहिती मिळाली. त्याच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली. रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जावेदचा खून तीन वाजता झाला. पण पोलिसांना सहा वाजता याची माहिती मिळाली. तब्बल तीन तास मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. घटनास्थळी मोठी गर्दी होती. मात्र, पोलिसांना माहिती देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.

ठसेतज्ज्ञ, श्वानपथक घटनास्थळी पाचारण

हल्लेखोराचा माग काढण्यासाठी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. जावेदचा मृतदेह स्वयंपाक खोलीत होता. तज्ज्ञांना महत्त्चाचे ठसे मिळाले आहेत. श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. हल्लेखोराने कुर्‍हाडीचा वापर केला असण्याची शक्यता आहे. पण हत्यार कोणतेच मिळाले नाही.

Back to top button