वाई : बलकवडी धरणात केवळ मृत पाणीसाठा | पुढारी

वाई : बलकवडी धरणात केवळ मृत पाणीसाठा

वाई ; पुढारी वृत्तसेवा :  वाई, खंडाळा, फलटण तालुक्याचे तारणहार असणार्‍या बलकवडी धरणात 29 टक्के पाणी साठा असून पाण्याचा खडखडाट झाला आहे. या धरणात आता फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी योजना सुरु ठेवण्यासाठी तो शिल्लक ठेवणे आवश्यक असून पाऊस वेळेत व मुबलक न झाल्यास पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

वाईच्या पश्चिम भागातील बलकवडी धरण हे चार टीएमसीचे आहे. वाई, खंडाळा, फलटण या भागासाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. बलकवडी धरण अतिवृष्टीच्या परिसरात येत असले, तरी यावर्षी मात्र निसर्गाची अवकृपा झाल्याने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. अतिवृष्ठीमुळे बंधारे, ओढ्यावरील पूल, शेततळी वाहून गेल्याने शेतकर्‍याचे जीवनमान उद्ध्वस्त झाले होते. मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने धरणात गाळयुक्त पाणी साठले गेले. धोम धरणासारखे बलकवडी धरणातसुध्दा गाळाचे प्रमाण जास्त आहे.

अतिवृष्टी असणार्‍या वाईच्या पश्चिम भागात धरणांमध्ये खडखडाट झाल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होवून धरण परिसरात पाण्याची भीषणता मे महिन्यात जाणवत आहे.

बलकवडी धरण यंदा लवकर खाली झाल्याने या धरणावर अवलंबून असणार्‍या पाण्याच्या स्कीम, शेतीच्या पाण्याच्या योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबीच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. करोडो रुपये खर्च करून जललक्ष्मी योजना या धरणावर उभारण्यात आली आहे. धरणात पाण्याचा खडखडाट झाल्याने जललक्ष्मी योजनेचे भवितव्य अडचणीत आले आहे. सध्या कोरोनामुळे या भागातील मुंबईला वास्तव्यास असणार्‍या चाकरमान्यांना व शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असल्याने पश्चिम भागात मुंबईकरांचा मोठा राबता चालू आहे. त्यांनाही टंचाईची झळ बसत आहे.

बलकवडी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बलकवडी धरणाच्या उपाय योजनांबाबत संबधित विभागाने हलगर्जीपणा करू नये.
– जितेंद्र गोळे, उपसरपंच गोळेगांव

Back to top button