दिवसरात्र उकाडा ; मालेगावकर घामाघूम, तापमान ‘इतक्या’ अंशांवर | पुढारी

दिवसरात्र उकाडा ; मालेगावकर घामाघूम, तापमान 'इतक्या' अंशांवर

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
यंदाचा उन्हाळा मालेगावकरांची परीक्षा पाहात आहे. तापमानाबरोबरच आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याने प्रचंड उकाडा जाणवत असून, नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. कमाल तापमान 42.4 अंशांवर कायम असून, किमान तापमानही 25 अंशांच्या उंबरठ्यावर स्थिर असल्याने दिवसरात्र घामाघूम राहावे लागत आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांना अजून काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. मालेगावकरांसाठी कडक उन्हाळा नवीन नाही. परंतु, यंदा तापमान सलग उच्चांकी पातळीवर कायम राहून, कमाल तापमानही दिलासादायक नाही. दिवसभर झळा सहन करून किमान मध्यरात्रीनंतर थंड हवेच्या लहरी शरीराला सुखावून जात. यंदा मात्र रात्रीही उकाडा पिछा पुरवत आहे. उन्हाच्या तप्त झळापासून सुरू होणारा दिवस रात्री घामांच्या धारांनी वलय पूर्ण करीत आहे. दोन – तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने सूर्य झाकोळला जात असला, तरी त्याचा तापमानावर कोणताच विशेष परिणाम होत नाही.

मालेगाव हे मजूर, कष्टकरी वर्गाचे शहर असून, बहुतांश नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची घरे ही पत्र्याची आणि कामाची ठिकाणेही पत्र्याच्या शेडचीच आहेत. पत्रे तापून तापमानात अधिकच भर पडते. सकाळही घामाच्या धारांपासून होते. 24 तास गरम हवा वाहते. त्यामुळे फॅन निष्प्रभ ठरत असून, कूलर आणि एसीला मागणी आहे. व्यवस्था असलेल्या नागरिकांकडून रात्री गच्चीवर, घराबाहेर झोपण्यास पसंती दिली जात असली, तरी डासांच्या प्रादुर्भावामुळे त्या ठिकाणी मच्छरदाणीशिवाय पर्याय नाही. खेळती हवा राखण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांमुळे चोरट्यांची भीती वाढल्याचेही बोलले जात आहे.

वर्दळीवर परिणाम
शासकीय कार्यालयांचा अपवाद वगळता, बाजारपेठेत दुपारी शांतता पसरते. सकाळच्या सत्रापेक्षा सायंकाळीच खरेदीसाठी घराबाहेर पडण्यास प्राधान्य दिले जाते. दुपारी प्रमुख मार्गांवरील दुचाकींची संख्या रोडावते. नियमित प्रवास करणार्‍यांना भरदुपारचा प्रवास असह्य होतो. वाहनाचे इंजीन, इंधन टाकी, तप्त डांबरी रस्ता आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य अशा विचित्र कोंडी अनुभवास येते.

हेही वाचा :

Back to top button