महागाईचा झटका, बजेटला दणका!! इंधन, गॅस दरात वर्षात ४५ ते ५० टक्के वाढ | पुढारी

महागाईचा झटका, बजेटला दणका!! इंधन, गॅस दरात वर्षात ४५ ते ५० टक्के वाढ

कोल्हापूर ; सुरेश पवार : महागाईच्या भडकत्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा लाखो कुटुंबांना या महागाईचा जबरदस्त तडाखा बसला आहे आणि सर्वसामान्य जे कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत, त्यांचेही मासिक बजेट महागाईच्या आघाताने कोलमडले आहे. कष्टकरीवर्गाचे जगणे मुश्कील झाले आहे, तर कनिष्ठ मध्यमवर्गीयांची दरमहाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे.

वर्षभरात इंधन दरात झालेली सरासरी पन्‍नास टक्के वाढ आणि त्या अनुषंगाने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ याची सर्वांनाच कमी-जास्त प्रमाणात झळ पोहोचली आहे. इंधनाचे दर वाढले की, मालवाहतूक भाडे वाढते. प्रवास महागतो. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ होते.

इंधन दरात प्रचंड वाढ

वर्षभरापूर्वी गेल्या मे महिन्यात पेट्रोलचा दर 78 रु. 31 पैसे लिटर होता. चालूवर्षी मे महिन्यात हाच दर 122 रुपयांवर गेला आहे. वर्षभरात पेट्रोल 44 रुपयांनी म्हणजे 50 टक्क्यांनी महागले आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात डिझेल दर होता लिटरला 67 रु. 25 पैसे. या वर्षीच्या मे महिन्यात हा दर 104 रुपयांवर गेला. म्हणजे डिझेल पन्‍नास टक्क्यांहून महाग होऊन डिझेल दरात 37 रु. वाढ झाली. वर्षभरात इंधनाच्या दरात एवढी वाढ होण्याची बहुधा पहिलीच वेळ असावी.

गॅसचा भडका

इंधनाबरोबरच घरगुती गॅसचाही भडका उडाला आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर 700 रुपयांना उपलब्ध होता. आता तो हजार रुपयांपलीकडे गेला आहे. गॅस सिलिंडर दरात 300 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. वर्षभरात सुमारे 45 टक्क्यांनी गॅस सिलिंडरची दरवाढ झाली असून, सर्वसामान्यांचे मासिक खर्चाचे बजेट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळत चालले आहे.

कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीयांप्रमाणे उच्च मध्यमवर्गीयांनाही महागाईचा ताप चांगला जाणवत आहे. कष्टकरीवर्गाची तर ससेहोलपटच आहे आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय महागाईच्या वणव्यात दरमहाचा खर्च कसा बसवायचा, या घोर चिंतेत आहेत.

बजेटला सुरुंग

सर्वसाधारणपणे 25 हजार ते 30 हजार एवढे ज्यांचे मासिक उत्पन्‍न आहे, अशा कनिष्ठ मध्यमवर्गाचे महागाईमुळे तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या मासिक बजेटला महागाईने सुरुंगच लागलेला आहे. कोणताही अवाजवी आणि अवास्तव खर्च न करता, पै आणि पै वाचवून 25 हजार ते 30 हजारांच्या मिळकतीत घर चालवायचे कसे, असा यक्षप्रश्‍न या वर्गापुढे उभा आहे.

25 हजार ते 30 हजार रुपये मासिक मिळकत असलेल्या आणि पती, पत्नी आणि दोन मुले अशा चौकोनी कुटुंब असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या मासिक खर्चाचे अंदाजपत्रक सोबत चौकटीत दिले आहे. त्यात कोणत्याही अनावश्यक खर्चाचा समावेश नाही. ऐनवेळी काही खर्च उभा राहिला, तर त्याची तरतूद करण्यासाठी आहे या उत्पन्‍नात बचत करायची सोय उरलेली नाही. दरमहाचे घरभाडे वेळेत दिलेच पाहिजे, ही कुटुंबप्रमुखाची मानसिकता असते.

‘कॅसाकेडिंग इफेक्ट’

इंधनाचे दर वाढले की, मालवाहतूक महागते आणि त्याच्या परिणामी जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होते. महागाईला चालना मिळते. या परिणामाला ‘कॅसाकेडिंग इफेक्ट’ (उरीरलरवळपस शषषशलीं) असे म्हटले जाते.

25 ते 30 हजार मासिक उत्पन्‍न असलेल्या पती, पत्नी आणि दोन मुले अशा चौकोनी कुटुंबाचे मासिक बजेट

घरभाडे                                7,000
पेट्रोल (रोज 1 लिटर)              3,500
गहू 15 कि.                             500
तांदूळ 15 कि.                         500
तूरडाळ 2 कि.                         250
इतर डाळी एक किलो              125
खाद्यतेल 3 किलो                    600
किराणा                              2,000
(चहा/साखर/पोहे/रवा/खोबरेल तेल/ साबण/धुण्याची पावडर/भांड्याचा साबण/मसाला पदार्थ/प्रसाधने इत्यादी)
भाजीपाला                           1,500
वीज/पाणी बिल                    1,500
गॅस सिलिंडर                       2,000
(गॅस गिझरसह दरमहा दोन)
दूध                                   1,000
शालेय खर्च तरतूद               2,000
टीव्ही/मोबाईल रिचार्ज         1,000
हॉस्पिटल तरतूद                 2,000
फळे                                   500
सणवार                               500
कपडे खरेदी                     2,000
नियोजनाची तरतूद
एकूण                            28,475

25 हजार ते 30 हजार मासिक उत्पन्‍न असलेल्यांची खर्चाची तोंडमिळवणी करताना कशी तारांबळ उडते, हे या खर्चाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

Back to top button