धुळे : पुढारी वृत्तसेवा
दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या रागातून जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी पावडी टाकून खून केल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील छावडी गावात घडला आहे. या प्रकरणात निजामपूर पोलिसांनी मारेकरी तरुणास गजाआड केले आहे.
साक्री तालुक्यातील छवडी गावात डुबक्या नाल्याजवळ सजन पवार यांचे निवासस्थान आहे. सजन तिरसिंग पवार यांना सतीश सजन पवार हा मुलगा आहे. सतीश याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी त्याच्या वडिलांकडे पैशांचा तगादा करत होता. मात्र दारू पिण्यासाठी सजन पवार यांनी त्याला पैसे दिले नसल्याचा राग सतीश पवार यांच्या मनात होता. दरम्यान दोघे बापलेक जेवण करत असताना सतीश याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याचा वाद उकरून काढून सजन पवार याला शिवीगाळ करन्यास सुरुवात केली. यानंतर रागाने बेभान झालेल्या सतीश याने आपल्या जन्मदाता पिता सजन पवार याच्या डोक्यात लोखंडी पावडी च्या दांडक्याने वार केला. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत सजन पवार यांना धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
मात्र डोक्याची जखम वर्मी असल्याने सजन पवार यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात शंकर कैलास पवार यांनी निजामपूर पोलिस ठाणे गाठून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पाटील यांनी तातडीने हालचाली करून सतीश सजन पवार याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.