

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
कांद्याला अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादकांना राज्य सरकारकडून अनुदान मिळण्याबाबत येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
येवला तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला पुरेसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. सध्या कांद्याला अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. राज्यातील कांदा हे महत्त्वाचे नगदी पीक असून ते खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी अशा हंगामात घेतले जाते. खरीप आणि उशिराचा खरीप हंगामात उत्पादित होणारा कांदा रब्बीच्या तुलनेत जास्त दिवस टिकवून ठेवता येत नाही. सध्या उशिराचा खरीप व रब्बी हंगामातील कांद्याची राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात चालू वर्षी २५ टक्के अधिक लागवडी वाढल्या आहेत. तुलनेत उत्पादन खर्च वाढून उत्पादनात मोठी घट आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यांत कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत स्थिर होते. मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यात दरात घसरण झाल्याने खर्च वसूल करणे अवघड झाले होते.
या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव अजूनही समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गुजरात राज्य सरकारच्या निर्णया प्रमाणे प्रतिक्विंटल २०० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेऊन कांद्याला अनुदान जाहीर करावे. दराच्या घसरणीवर दिलासा देण्याच्या मागणीचा सहानुभूती पुर्वक विचार करून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी विनंती तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
भाजप सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कांद्याला प्रती क्विंटल २०० रु. अनुदान देऊन कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मदतीचा हात दिला होता. या राज्य सरकारने ही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन उभे करेल व याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजप नेते सदस्य बाबा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, नानासाहेब लहरे, संतोष काटे, सुनील सोमसे, महेश पाटील, सुधाकर पाटोळे, संतोष केंद्रे, चेतन धसे, युवराज पाटोळे, दीनेश परदेशी, दत्ता सानप, पांडुरंग शेळके पाटील, विनोद बोराडे, सतीश जाधव, दीपक गाढे, राजेश नागपुरे, प्रमोद चव्हाण, रईस मुलतानी, केदारनाथ वेळांतकर, संपत कदम यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.