धारावी : बलात्काराची खोटी तक्रार तरुणीला भोवली | पुढारी

धारावी : बलात्काराची खोटी तक्रार तरुणीला भोवली

धारावी ; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलगा, त्याचा भाऊ, वडील व मुलांचे चार काका यांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खोटी तक्रार करणे एका तरुणीला भोवले आहे. न्यायालयाने या प्रकरणी सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. दरम्यान, आपल्या अल्पवयीन मुलावरच या तरुणीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्याच्या आईने केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे धारावीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, फरार झालेल्या या तरुणीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धारावीतील 90 फूट रस्त्यावरील एका इमारतीमध्ये राहणार्‍या तरुणीचे नात्यातील अल्पवयीन मुलावर सप्टेंबर 2021 पासून एकतर्फी प्रेम होते. ती कामाचा बहाणा करून त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायची. लग्न करण्याची इच्छा असल्याचे वारंवार सांगायची. तिने 19 जानेवारीला या मुलाला आपल्या आई-वडिलांनी घरी बोलावल्याचे सांगितले. मात्र घरात ती एकटीच असल्याचे आढळल्यावर हा मुलगा बावरला.

या तरुणीने त्याला जबरदस्तीने घरात बसवून चहा दिला व धमकावून लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिने या मुलाला वाशी येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर त्याला सोडून ती मिरा भाईंदरला मैत्रिणीकडे निघून गेली.

दरम्यान, सकाळपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा शोध तिच्या आई-वडिलांसह भावाने सुरू केला होता. या मुलासोबत ती गेल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांचा राग अनावर झाला. तोपर्यंत परत आलेल्या या मुलालाच पाठवून तरुणीला घरी आणले. कुटुंबीयांनी तिला मारहाण केली व या मुलाचे वडील, चार काका व भाऊ यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार धारावी पोलीस ठाण्यात दिली.

या तरुणीने केलेल्या आरोपामुळे पीडित अल्पवयीन मुलाचे कुटुंबीय हवालदिल झाले. मात्र काही दिवसांतच त्यांनी न्यायालयात सबळ पुरावे दाखल केल्याने त्यांना जामीन मिळाला. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून या तरुणीवर धारावी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक वैशाली चव्हाण अधिक तपास करत आहेत.

पीडित मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

या तरुणीने दाखल केलेल्या सामूहिक बलात्काराच्या खोट्या तक्रारीमुळे पीडित मुलगा आणि त्याचे कुटुंबीय हादरून गेले. दरम्यानच्या काळात नैराश्य आलेल्या या अल्पवयीन मुलाने वाशी पुलावरून खाडीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी पुलाचे काम करणार्‍या कामगारांनी त्याचा जीव वाचवला होता.

Back to top button