नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीची 10 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेली प्रक्रिया दि. 11 मेपासून पुन्हा सुरू होत आहे. तसेच प्रभाग रचनेशी संबंधित कामकाजाबरोबरच राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे निवडणुकीविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस यांनी मंगळवारी (दि.10) आदेश प्रसिद्ध करून अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 फेब—ुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून 14 दिवस हरकती व सूचना घेत 14 फेब—ुवारी रोजी प्रक्रिया पूर्ण केली. त्यावर 17 ते 26 फेब—ुवारी या दरम्यान प्राप्त हरकतींवर प्रत्यक्षरीत्या सुनावणी असून, त्यानंतर 5 मार्च रोजी अहवाल राज्य निवडणूक आयोगास महापालिकांमार्फत पाठविण्यात आला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने 10 मार्च रोजी प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे सणस यांनी पत्रात म्हटले आहे.
निवडणूक विभागाच्या संबंधित पत्रात 18 पैकी 16 महापालिकांची निवडणूक प्रक्रिया अंतिम झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, संबंधित महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांनी राज्य निवडणूक आयोग कार्यालयात येत अंतिम हात फिरविला असून, अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे.