मर्कटलीलांनी त्र्यंबकवासीय त्रस्त, वनविभागाच्याही हाती लागेना टोळ्या | पुढारी

मर्कटलीलांनी त्र्यंबकवासीय त्रस्त, वनविभागाच्याही हाती लागेना टोळ्या

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर शहरात गेल्या महिन्यापासून ब्रम्हगिरी, गंगाद्वार येथील माकडांच्या टोळ्यांंनी तळ ठोकला असून, शहरात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

ब्रम्हगिरी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड झाली आहे. जमीन सपाटीकरणाच्या नावाने झालेल्या तोडफोडीमुळे माकडांचा नैसर्गिक अधिवास हिरावला गेला आहे. खाण्याचे आणि पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने माकडांनी आता शहराकडे मोर्चा वळवला आहे. दिवसभर घरांच्या छपरावरून तसेच बाल्कनीत उड्या मारत शहराच्या या टोकाच्या त्या टोकला फिरतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ, महिला वाळवणाचे पदार्थ करीत आहेत. माकडांची टोळी या वडे, पापडांवर ताव मारत असल्याने महिलांची हे पदार्थ उचलण्यासाठी धावपळ होते आहे. काही घरांच्या गच्चीत असलेल्या पाण्याच्या टाक्यादेखील माकडांनी लक्ष केल्या आहेत.

त्यांचे झाकण काढून आत ठोकणे अथवा सरळ तोट्या सोडून देतात. त्यामुळे पाण्याची नासाडी होते आहे. पुरोहितांच्या घरात शिरून पूजा साहित्याचीही नासधूस केली जात आहे. कुशावर्तावरदेखील मांडलेली पूजा विस्कटून टाकण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील केबल प्रसारणही विस्कळीत झाले आहे. केबलला ते लटकत असल्याने केबल तुटण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे केबलचालकही वैतागले आहेत. काही भाविकांना चावा घेतल्याचेही प्रकार घडत आहेत. याबाबत वनविभागाला माहिती कळवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

नागरिकांनी माहिती देताच रेस्क्यू टीम पाठविण्यात येते. मात्र, माकडांनी तोपर्यंत ती जागा बदललेली असते. त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचणी येत आहेत.
– राजेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा :

Back to top button