सातारा : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय कौतुकास्पद आहे. समाजाला दिशा देणारा हा निर्णय आहे. हा पॅटर्न राज्यभर राबवण्यासाठी ग्राऊंड वर्क सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधवा महिलांचा सन्मान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने अनोखा निर्णय घेतला आहे. याबाबत खा. सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या निर्णयाबद्दल हेरवाडच्या सरपंच व अधिकार्यांचे कौतुक करते. त्यांनी अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे. खुप दिवसांनी खूप मोठे सामाजिक काम हेरवाड या गावाने केले आहे. देशात जेव्हा परिवर्तन होते, त्याची सुरूवात महाराष्ट्रातून होते. शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून ही गोष्ट झाली, ती खूप चांगली झाली.
हा उपक्रम राज्यभर राबवणार का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे त्यांच्या मागणीची यादी मागितली आहे. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ना. हसन मुश्रीफ व महिला बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्याशी प्रथम चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रात हा निर्णय कसा लागू करणार यावेळी चर्चा केली जाणार आहे.
हेरवाड ग्रामस्थांची गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांच्याशीही भेट घालून दिली आहे. या विषयाचे ग्राऊंड वर्क झाल्यानंतर मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव घेवून जाणार आहोत. पुरोगामी विचारांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. यासाठी मुख्यमंत्री हो म्हणतील, अशी अपेक्षाही सुळे यांनी व्यक्त केली.