नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व इतरही जवळपास सर्वच वस्तूंमध्ये महागाईच्या झळा तीव्र होत असताना, आता पुन्हा एकदा व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे किचनचे बजेट पुन्हा एकदा बिघडले असून, हॉटेलच्या जेवणाबरोबरच घरगुती जेवणालाही आता महागाईची झळ बसली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहेत. अवघ्या दोनच महिन्यांत त्यामध्ये तब्बल 350 रुपयांची वाढ झाल्याने, सिलिंडरची किंमत 2,357 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या खाद्यपदार्थांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढविल्या आहेत. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही 50 रुपयांनी वाढविल्याने, घरगुती जेवणही महाग झाले आहे. या वाढत्या किमतींमुळे दोन्हीकडच्या किचनचे बजेट पूर्णत: कोलमडले असून, सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांनाही याची मोठी झळ सोसावी लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात तर तब्बल तीन वेळा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या. 4 फेब्रुवारी रोजी 25 रुपये, 14 फेब्रुवारी रोजी 50, तर 25 फेब्रुवारी रोजी 25 अशा एका महिन्यात 100 रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या होत्या. त्यानंतर 1 मार्च रोजी पुन्हा 25 रुपयांनी किमती वाढविल्या, तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये 1 ऑक्टोबर 2021 पासून सातत्याने वाढ केली जात आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात असल्याने, व्यावसायिकांनी 1 तारखेची अक्षरश: धास्तीच घेतली आहे. दरम्यान, वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असून, सरकारने किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
आणखी किमती वाढणार : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती हजारापार गेल्या असल्या तरी, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम किमतींवर होत आहे. पुढच्या काळातही जागतिक स्तरावर अनेक मोठे बदल घडण्याची शक्यता असल्याने, गॅस सिलिंडरच्या किमतींचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.
भाजीपाला, धान्य, खाद्यतेल व किचनमधील इतरही साहित्य महागल्याने, किचनचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. दर महिन्याला आम्ही किराणा भरण्यासाठी ठराविक खर्च करतो. पगाराचा विचार करून हा खर्च ठरलेला आहे. मात्र, ज्या पद्धतीने किमती वाढत आहेत, त्यावरून हा खर्च कमी पडत आहे. मात्र, पगारवाढ नसल्याने, आहे त्या किमतीतच भागवावे लागते. – संगीता मोरे, गृहिणी