नाशिकचे चांदवड : हंडाभर पाण्यासाठी टँकरसमोर दाटी | पुढारी

नाशिकचे चांदवड : हंडाभर पाण्यासाठी टँकरसमोर दाटी

चांदवड : (जि. नाशिक) सुनील थोरे
मे महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तापमानात कमालीची वाढ झाल्याने भूगर्भातील पाणीपातळी अतिखोल गेली आहे. पर्यायाने पाण्याचे स्रोत आटून पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भिक्ष भेडसावू लागले आहे. एकीकडे वाढलेले तापमान अन् दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी चांदवडकरांची तप्त उन्हात उडालेली धावपळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या, तालुक्यातील तीन गावांना 3 पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू असून, 3 गावे व चार वस्त्यांवर टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव शासकीय यंत्रणेकडे प्राप्त झाले आहेत. यावरून तालुक्यातील पाणीटंचाई पुन्हा एकदा निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे.

चांदवड तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने पाऊस जेमतेमच पडतो. पर्यायाने तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवत असतो. यामुळेच की काय, चांदवड अन् दुष्काळ या दोन्ही शब्दांचे जणू एकमेकांशी घट्ट नातेच कित्येक वर्षांपासून जुळले आहे. चांदवड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत बदल व्हावा, यासाठी जलयुक्त शिवार अन् जलसंधारणाची चांगली कामे करण्यात आली. या कामांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरले गेले. पर्यायाने जमिनीतील पाणीपातळीत वाढ होऊन भूगर्भातील पाणी दीर्घकाळ टिकून राहण्यास हातभार लागला. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये भेडसावणारी पाणीटंचाई गेल्या तीन-चार वर्षांपासून कमी झाली आहे. उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी म्हणजे मे महिन्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एप्रिल महिन्यात वातावरणातील बदलामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.

तालुक्यातील दरेगाव, कानडगाव व कातरवाडी येथील पाण्याचे स्रोत आटल्याने तेथे रोज तीन टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यात साडेबारा हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे दरेगावला 3 खेपा, कानडगावला 2 खेपा, तर कातरवाडीला एक खेप अशा एकूण 6 खेपा मारल्या जात आहेत. टँकरद्वारे पाणी गावातील सार्वजनिक विहिरीत ओतले जाते. त्यानंतर गावकरी दोरबादलीच्या साहाय्याने पाणी बाहेर काढून स्वतःची व कुटुंबाची तृष्णा भागवत आहे. या दररोजच्या दिनचर्येमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.

या गावांचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव
चांदवड तालुक्यातील परसूल, गंगावे येथील नरोटे वस्ती, निमोण येथील सप्तशृंगी वस्ती, धनदाई वस्ती, तारणरोड वस्ती आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची दखल घेत गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे पाठविली आहेत. लवकरच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होण्याची अपेक्षा आहे.

44 गाव पाणीपुरवठा योजनेमुळे दिलासा
तालुक्यातील जवळपास 70 ते 80 गावांना ओझरखेड धरणावरील एमजीपीच्या 44 गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनेमुळे 80 टक्के पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. टंचाई काळात चांदवड-लासलगाव चौफुलीवरील 44 गाव पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलकुंभातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पर्यायाने 44 गाव पाणीपुरवठा योजना तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरली आहे.

चांदवड : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना एमजीपीच्या याच जलकुंभातून टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे.

42 गावे योजना बंद
असल्याने टंचाई
नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणावरील 42 गाव पाणीपुरवठा योजना गलथान कारभारामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद पडली आहे. या योजनेवर तालुक्याच्या पूर्व भागातील 16 गावांना पाणीपुरवठा व्हायचा. मात्र, योजना बंद पडल्यामुळे 16 गावांतील पाणीपुरवठा ठप्प आहे. ही योजना सुरू करण्यासाठी दुगाव जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी पुढाकार घेतला असता, तर ही योजना पुन्हा सुरू झाली असती. मात्र, ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा हलगर्जीपणा अन् उदासीनतेमुळे आज दरेगाव, कानडगाव, निमोणसह इतर गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

चांदवड : तालुक्यातील विहिरींनी गाठलेला तळ.

हेही वाचा :

Back to top button