नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदाघाटाच्या सौंदर्यीकरणात वाढ व्हावी आणि हा परिसर अतिक्रमणमुक्त असावा यादृष्टीने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी पावले उचलली असून, त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आधी चार आणि आता पुन्हा आणखी चार अशा आठ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी गोदाघाट परिसरातील अतिक्रमणांसंदर्भात अहिल्यादेवी होळकर पूल ते रामसेतू या परिसरात असलेल्या अनधिकृत टपर्या तसेच दुकाने तातडीने हटविण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले आहेत. यामुळे आता गोदाघाट तसेच रामकुंड या परिसरात पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांशिवाय अन्य कोणतीही टपरी किंवा हातगाडी यापुढे दिसणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी आयुक्तांनी पंचवटी विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण विभागावर सोपविली आहे. त्याचबरोबर या भागातील अनधिकृत पार्किंगही बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पवार यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध भागांना अचानक भेटी देण्याचा सपाटा लावला आहे.
यामुळे मनपातील अधिकार्यांच्या पायालाही आता भिंगरी लागली आहे. मागील एका पाहणी दौर्यात पवार यांना रामकुंडासह गोदाघाट परिसरात अतिक्रमण असल्याचे आढळून आले होते. तसेच गोदावरी नदीपात्रातच अनेकांकडून वाहने, भांडी, कपडे धुण्याची बाब निदर्शनास पडली होती. यामुळे त्यांनी येथील स्वच्छतेबरोबरच अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पंचवटी विभागीय कार्यालय आणि अतिक्रमण विभागाने येथील अनधिकृत बाजार हटविला. परंतु, अनधिकृत टपर्या तसेच दुकाने कायम होती. पवार यांनी गुरुवारच्या (दि. 5) भेटीत पथकासह गोदाघाटाची पाहणी करत अस्वच्छता तसेच अतिक्रमण याकडे पवार यांनी पुन्हा अधिकार्यांचे लक्ष वेधून अधिकार्यांची कानउघडणी केली.
..तर विभागीय अधिकार्यांवर कारवाई
आदेशानंतरही गोदाघाट आणि परिसराच अतिक्रमण वा बेकायदा काम आढळून आल्यास त्यास यापुढे विभागीय अधिकार्यांनाच जबाबदार धरले जाणार असल्याचा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.