फलटण; पुढारी वृत्तसेवा : दिगंबर आगवणे यांना 2019 साली झालेल्या निवडणुकीत पैशांची गरज असल्याने ते भेटल्यानंतर त्यांना 10 लाख रुपये दिले. हे पैसे निवडणूक झाल्यानंतर देतो, असे त्यांनी सांगितले. मात्र आजतागायत पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये त्यांच्या विरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गिरीश उर्फ विपुल बजरंग येवले (वय रा. मुंजवडी ता. फलटण) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. येवले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विश्वासराव भोसले व तक्रारदार यांची ओळख आहे. भोसले यांच्या ओळखीच्या मध्यस्थीने दिगंबर आगवणे यांनी 2019 साली विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याने हात उसने 10 लाख रुपयांची मागणी केली. पैशांची तजवीज झाल्यानंतर तक्रारदार यांनी चौघांच्या समक्ष रोख 10 लाख रुपयांची रक्कम दिली. संबंधित रक्कम निवडणूक झाल्यानंतर देतो, असे आगवणे यांनी सांगितले होते.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आगवणे पैसे देत नसल्याचे पाहून त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली. यावेळी आगवणे यांनी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून नंतर पैसे देतो, असे सांगितले. 2020 मध्ये पुन्हा पैशांची मागणी केली असता आगवणे यांनी कोरोनाचे कारण सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, काही कालावधीनंतर आगवणे यांनी बनावट सही करुन तक्रारदार यांना चेक दिला. मात्र चेक बँकेत भरताना अगोदर मला विचारा असे सांगितले. त्यानुसार चेक भरण्यापूर्वी तक्रारदार यांनी विचारले असता आगवणे यांनी तक्रारदार यांनाच दमदाटी केली.
या सर्व घटनेनंतर तक्रारदार यांनी फलटण न्यायालयात दाद मागितली. त्यानुसार कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत तपास करुन न्यायालयात चार्जशीट पाठवण्यास सांगितले आहे. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी दिगंबर आगवणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.