जळगाव : मान्सूनचा निम्मा कालावधी संपला; प्रकल्पांची स्थिती चिंताजनक | पुढारी

जळगाव : मान्सूनचा निम्मा कालावधी संपला; प्रकल्पांची स्थिती चिंताजनक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात जून-जुलैच्या ६१ दिवसांत केवळ ३५ दिवसांत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनच्या १२० दिवसांच्या कालावधीपैकी निम्मा कालावधी संपला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत पीक परिस्थिती समाधानकारक असली तरी दमदार पावसाअभावी नदी नाले ओढे खळाळून वाहिलेले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पात अत्यल्प पर्जन्यमानामुळे प्रकल्पांची स्थिती चिंताजनकच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मान्सूनचा सरासरी निम्म्यापेक्षा अधिक कालावधी संपला असूनही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अजुनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. गत दोन महिन्यात केवळ ३५ दिवस पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे. जिल्ह्याचे मान्सूनचे सरासरी पर्जन्यमान ६३२.६ मि.मी. निर्धारित असून आतापर्यंत जून महिन्यात ११२.५ मि.मी. तर जुलै मध्ये केवळ ६०.४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात मान्सूनचा निम्मा कालावधी संपला आहे. पीक परिस्थिती मध्यम स्वरूपात आहे. पिकांच्या वाढीसाठी समाधानकारक पावसाची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी लघू मध्यम प्रकल्प होते ‘ओव्हर फ्लो’

गतवर्षी याच काळात जिल्ह्यातील भोकरबारी, बहुळा, अंजनी आणि मोर प्रकल्प वगळता इतर लघू मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ होते. तर गिरणा, वाघूर सह अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक होत असल्याने उपयुक्त जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली होती. तर दमदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प सप्टेंबर पूर्वीच ‘ओव्हर फ्लो’ होते.

पाण्याचे नियोजन करणे आवश्यकच

सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात २५ ते ३६ % उपयुक्त जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पांची स्थिती चिंताजनकच असल्याचे दिसून येत आहे. परिणामी उपलब्ध असलेल्या उपयुक्त जलसाठ्यातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे.

हे ही वाचलत का :

हे पहा :

मुंबईजवळ वसलेल्या सोंडाई गडाची सफर

https://www.youtube.com/channel/UC6SP_igv78fiJhhy_voqpIg

Back to top button