राहूल गांधी : आधी झापडे काढून ठेवा | पुढारी

राहूल गांधी : आधी झापडे काढून ठेवा

ओझे वा गाडी खेचून नेणार्‍या घोड्याच्या डोळ्यांना झापडे लावलेली असतात. कारण, त्याने निमूट ओझे ओढावे व समोर धावत राहावे, हीच त्याच्याकडून अपेक्षा असते. जर त्याचे डोळे झापडाअभावी उघडे राहिले व सर्वत्र बघू लागले, तर त्याचे लक्ष विचलित होते. त्याचा वेग आपोआप कमी होतो. म्हणूनच ओझे ओढणार्‍याची नजर चौफेर फिरण्यावर प्रतिबंध घालावा लागत असतो. त्याने तेवढेच बघावे किंवा समजावे अशी गाडीवानाची इच्छा असते; परंतु ज्यांना गाडी वा ओझे खेचायचे नसते, त्यांनी चौफेर बघणे अगत्याचे असते; अन्यथा गाठीशी कितीही बुद्धी असली तरी त्यांची अवस्था त्या झापडे लावलेल्या घोड्यासारखी होत असते.

जितके दाखवले तितकेच बघून त्यावर आपले मत बनवण्याला पर्याय नसतो आणि इतरांच्या इच्छेनुसार त्यांची बुद्धी कुंठीत होत असते. देशातल्या माध्यमांची वा त्यात कार्यरत असलेल्या जाणकारांची बुद्धी काहीशी तशीच कुंठीत झालेली आहे काय; याची आता शंका घ्यायला जागा आहे. तसे नसते तर राहुल गांधींनी योजलेल्या नाश्ता-फराळाच्या मेजवानीला किती व कोणते राजकीय पक्ष उपस्थित राहिले, त्याचे गुणगान करण्यापेक्षा काँग्रेसचेच एक ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल अधिक घेतली गेली असती.

मागल्या सात वर्षांपासून मोदींविरोधातली मोहीम राहुल गांधी मोठ्या आवेशात चालवित आहेत, पण त्यांना त्यात यश मिळण्यापेक्षाही त्यांच्या बरोबर भरकटलेल्या अन्य पक्षांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. राहुल गांधींच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेतेही असल्या राजकारणाने वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांचे ऐकून विचारविनिमय करण्याला विरोधी पक्षांनी प्राधान्य दिले असते, तर त्याचा लाभ नाही तरी निदान तोटा नक्‍की झाला नसता.

संबंधित बातम्या

मोईली हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि यूपीए काळात केंद्रात कायदामंत्री म्हणून काम केलेले अनुभवी नेते आहेत. त्यांनी मोदींविरोधी व्यक्‍तिगत निंदा वा विरोधासाठी विरोध हे धोरण आत्मघातकी असल्याचे सांगितले. किंबहुना, त्याचा अधिक लाभ मोदींना मिळत असून विरोधी पक्षांकडे कुठलाही राजकीय कार्यक्रम वा धोरण नसल्याची जनभावना होत असल्याचा धोका दाखवला आहे. त्याचा अर्थ इतकाच होतो, की विरोधातली भाषा कितीही बोचरी वा धारदार असली, तरी त्यामागे जनहिताचा कुठलाही हेतू दिसत नाही. म्हणूनच सामान्य जनता त्यापासून अलिप्‍त राहतेे. विरोधकांचा आक्रोश केवळ आत्मसंतुष्टतेच्या मर्यादेत अडकून पडला आहे, असेच मोईली सांगत आहेत. त्यामुळे ज्याला जनतेचा पाठिंबा नाही, अशा कितीही पक्षांचा कशाही बैठका झाल्या, म्हणून राजकारण यशस्वी होऊ शकणार नाही. लागोपाठच्या निवडणुकांनी यापेक्षा वेगळे काहीही साध्य झालेले नाही.

इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. पेट्रोल वा अन्य महागाईने लोक बेजार झाले आहेत. तो जीवनावश्यक विषय आहे, पण संसदीय पावसाळी अधिवेशनात त्यावरून कुठेही सरकारला जाब विचारला गेला नाही, पण दोन आठवडे संसदीय कामकाज पेगासस नावाच्या वादळाने थंडावले आहे, पण नित्यनेमाने इंधनाची दरवाढ आधीच विस्कटलेल्या संसारात विघ्न आणते आहे. तो कोट्यवधी सामान्य लोकांसाठी जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे. त्यावर विरोधी पक्षांनी संसदेत कुठलाही हलकल्लोळ माजवलेला नाही. त्यापेक्षा मोदी सरकार विरोधकांचे फोन चोरून ऐकते, यावर काहूर माजले आहे. मग त्या विरोधी पक्षांना सामान्य जनतेच्या दुर्दशेची किती चिंता आहे? असा प्रश्‍न लोकांना पडला तर नवल कुठले? अशा विषयावरून दोन वा दोनशे पक्ष एकत्र आले, तरी लोकांना त्यांच्याविषयी आत्मीयता वाटणे शक्य नाही. मात्र, हे लोक केवळ मोदींना बदनाम करण्यासाठी निमित्त शोधत असतात आणि मतदारांविषयी उदासीन असतात, हीच धारणा होणे स्वाभाविक आहे.

विरोधी एकजुटीमध्ये असलेल्या त्याच वैगुण्यावर वीरप्पा मोईलींनी बोट ठेवले आहे. विरोधकांना मोदी आवडत नसतील म्हणून मतदाराने त्यांचा पराभव करावा, हे राजकारण होऊ शकत नाही. मोदी वा भाजप जनहिताला बाधक असल्याचे आरोप वा त्यासाठीचे पुरावे समोर आणल्यास लोक सरकारविरोधात कंबर कसून उभे राहू शकतात. नेमका त्याच गोष्टीचा अशा मेजवान्या चहापान वा बैठकांमध्ये अभाव असेल, तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. अशा नाश्त्याला किती व कोणते पक्ष उपस्थित राहिल्याने राजकारणावर कुठलाही प्रभाव पडू शकत नाही. हे निदान मागल्या सात वर्षांतले जळजळीत वास्तव आहे. विरोधी पक्ष वा सरकारच्या टीकाकारांनी तिकडे कितीही पाठ फिरवली, म्हणून सत्य बदलत नाही किंवा त्याचे परिणामही बदलू शकत नाहीत. राजकीय हेवेदावे आणि विरोध यातूनच राजकारण चालत असते, पण त्याच भांडणामध्ये जेव्हा जनहिताचा बेमालूम समावेश केला जातो, तेव्हाच राजकीय परिणाम बदलत असतात. राहुल गांधी वा यशवंत सिन्हा यांच्या अनेक बैठकांमध्ये नेमका तोच हेतू वा कार्यकारणभाव दिसत नाही. याकडेच मोईली यांनी लक्ष वेधले आहे, पण तिकडे बघायचे तर डोळ्यावरची झापडे उतरवून ठेवावी लागतील आणि चौफेर द‍ृष्टिक्षेप टाकण्याचे धाडस करावे लागेल.

Back to top button