नाशिक : पावसाळ्यापूर्वी सागझडी निर्मितीच्या कामांनी घेतला वेग | पुढारी

नाशिक : पावसाळ्यापूर्वी सागझडी निर्मितीच्या कामांनी घेतला वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी वनविभागाकडून पावसाळ्यात वृक्षारोपणासह स्थानिक नागरिक, शासकीय कार्यालय व सामाजिक संस्थांना रोपे उपलब्ध करून दिले जातात. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदाच्या वनमहोत्सवासाठी वनविकास महामंडळाकडून जय्यत तयारी सुरू असून, सागझडी निर्मितीच्या कामांनी वेग घेतला आहे. मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार वरिष्ठ एफडीसीएमच्या अधिकार्‍यांनी वर्तविला आहे.

यंदा वनमहोत्सवांतर्गत नाशिक वनविकास महामंडळाला 50 हेक्टर मिश्र रोपवनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये 4 लाखांहून अधिक साग व 90 हजारांपर्यंत मिश्र रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी वनविकास महामंडळाच्या नाशिक रेंजमधील मखमलाबाद रोपवाटिका व म्हसरुळ डेपो रोपवाटिकेत मिश्र व सागांची रोपे तयार केली जात आहे. सागझडी निर्मितीसाठी वनकर्मचार्‍यांसह काही कंत्राटी कर्मचार्‍यांचीही मदत घेण्यात येत आहे.

यंदा महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाळ्यापूर्वीच रोपे तयार करण्यासाठी सध्या वनविकास महामंडळाची लगभग सुरू आहे. रोपे तयार करण्यासाठी माती व खताचे मिश्रण करून पिशव्यांमध्ये बियाणे टाकली जातात. सागासोबतच खैर, शिवण, आवळा व शिसम आदी महत्त्वाच्या वृक्षांची रोपे तयार केली जात आहेत. तयार रोपांसाठी खास वाफे बनविण्यात आले असून, त्यांच्या नियमित देखभालीसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रुट ट्रेनर व स्टंपचा वापर
सागाचे रोपे तयार करण्यासाठी रुट ट्रेनरचा व स्टंपचा वापर केला जातो. रुट ट्रेनर म्हणजे त्यात सागवनाच्या बिया टाकून त्याद्वारे रोपे तयार करतात. तर स्टंप म्हणजे सागाच्या झाडांच्या मुळ्यांपासून रोपे बनविली जातात. रुट ट्रेनर पद्धतीने 22 हजार 500 रोपे तयार केली जाणार आहे. उर्वरित सागझडीसाठी स्टंपचा वापर होणार असून, दोन्ही पद्धतीने सुमारे 4 लाख रोपे तयार केली जाणार आहे.

यंदाच्या वनमहोत्सावात 50 हेक्टरवर रोपवन केले जाणार असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. मान्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून मखमलाबाद रोपवाटिका व म्हसरूळ डेपो रोपवाटिका येथे सागासह मिश्ररोपे तयार करण्याचे काम केले जात आहे.
– दिलीप बोरसे,
प्रभारी वनक्षेत्रपाल
वनविकास महामंडळ,
नाशिक

हेही वाचा :

Back to top button