कांदानगरीच्या डोळ्यात पाण्यासाठी अश्रू | पुढारी

कांदानगरीच्या डोळ्यात पाण्यासाठी अश्रू

लासलगाव (जि. नाशिक) : राकेश बोरा
कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या लासलगावमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत असून, 16 गाव पाणीयोजना जुनी झाल्याने पाणीपुरवठ्यात अनेक अडचणी येत आहेत. योजनेचे पाइप जीर्ण झाल्याने कधी 33 केव्हीए लाइन ट्रिप होणे, कधी गळती लागणे यासारखे प्रकार घडत असल्याने शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे अधीच पंधरा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा अनियमित होत आहे. यामुळे पाणीप्रश्न लासलगावकरांच्या डोळ्यात अश्रू आणत असल्याचे चित्र आहे.

लासलगाव ही निफाड तालुक्यातील मोठी कृषी बाजारपेठ असून, स्थानिक 20 हजार लोखसंख्येसह शहरात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र, येथील सध्याची पाण्याची स्थिती पाहता गावात सर्वत्र पाणी समस्या हाच विषय चर्चेला जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर याबाबत चर्चा झडत आहेत.

योजनेच्या लाभार्थी गावांना टंचाईचा फटका
धरणात मुबलक पाणी असतानाही पाइललाइन फुटणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक कारणांमुळे या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. कडक उन्हाळा त्यात 41 अंश तापमान आणि अनियमित पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

जलजीवन अंतर्गत
17 कोटींचा निधी
लासलगाव हे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघातील मोठे गाव असून, सरपंच जयदत्त होळकर यांच्या प्रयत्नाने येथे विंचूरसह 16 गाव योजनेला जलजीवन मिशन अंतर्गत नूतनीकरणाच्या प्रस्तावास मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून 17 कोटी 54 लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यात 50 टक्के निधी हा केंद्राकडून मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप या कामाची निविदा प्रकिया पूर्ण झालेली नाही.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू
लासलगावसह 16 गाव पाणी प्रश्नाबाबत ना. भुजबळ यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर नवीन योजना कार्यान्वित होईपर्यंत 16 गावच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 15 वित्त आयोगाच्या बंधित निधीतून खर्च करण्यास मंजुरी मिळाल्याने या योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

संस्था, संघटनांकडून
टँकरने पाणीपुरवठा
सोनिया होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, डी. के. नाना जगताप मित्रमंडळ, जयदत्त होळकर मित्रमंडळ यांच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जातो. किमान या टँकरमुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळत आहे.

आमदनी अठन्नी, खर्चा रुपया..
पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सहाशे लिटर पाण्यासाठी नागरिकांना दीडशे रुपये टँकर, तर वीस रुपयांत पाणी जार घ्यावा लागतो. सध्या शहरात खासगी 10 ते 12 टँकर पाणीपुरवठा करत असून, दररोज 120 ते 150 फेर्‍या मारतात. विशेष म्हणजे त्यासाठी नागरिकांना दोन ते तीन दिवस टँकरची प्रतीक्षा करावी लागते.

50 टक्के निधी केंद्र सरकारकडून मंजूर 

17. 54 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून मंजूर 

10-12 खासगी टॅंकरने दररोज होतोय पाणीपुरवठा 

120-150 टॅंकरच्या दररोज होतात फे-या 

सबस्टेशन रानवड येथे 132/33 केव्ही उपकेंद्राचे काम सुरू असल्याने दोन दिवसांपूर्वी 9 तास वीज उपलब्ध नसल्याने पाण्याचे नियोजन विस्कटले होते. तर 33 केव्हीए लाइन नेहमी ट्रिप होत असल्याने पाइप लिकेज होतात. त्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा येतो.
– शरद पाटील,
ग्रामविकास अधिकारी

महागाईने आधीच नागरिक त्रस्त असताना दैनंदिन लागणारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात उष्म्याने जीव घायाळ होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. रोज पाणी विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही.
– प्रशांत काळे,
नागरिक, लासलगाव

ग्रामपालिकेच्य नियोजनामुळे नागरिकांना आठ, तर कधी पंधरा दिवसांआड पाणी मिळते. पण पाणीपट्टी दरमहा वसूल केली जाते. नळाला महिन्यातून एक किंवा दोनदाच पाणी येते. पाणीपट्टी वसूल करताना विचार केला पाहिजे. प्रशासनाने किमान दोन वर्षांची पाणीपट्टी माफ करावी.
– प्रकाश पाटील,
तालुकाप्रमुख, शिवसेना

हेही वाचा :

Back to top button