नाशिक : बसवंत कृषी पर्यटन महोत्सवाअंतर्गत आंबा महोत्सव स्पर्धा

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : आनंदी जीवनासाठी कृषी संस्कृती आणि कृषी पर्यटन यांचे महत्त्व सांगणारा महोत्सव म्हणजेच बसवंत कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन ग्रीनझोन ॲग्रोकेम प्रा. लि., नाशिक यांच्या माध्यमातून बसवंत गार्डन, पिंपळगाव बसवंत येथे दि. ११ ते १५ मे दरम्यान आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यांत पिकविण्यात येणाऱ्या विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन भरविण्यात येऊन उत्कृष्ट आंबा उत्पादकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मिलांज हापूस महाराजा आणि मिलांज केशर महाराजा असे दोन पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना ५,००१ रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच हापूस, केशर व इतर जातींच्या आंबा उत्पादकांनाही प्रथम (तीन हजार रुपये), द्वितीय (दोन हजार रुपये) व तृतीय (एक हजार रुपये) आणि उत्तेजनार्थ असे एकूण १६ पुरस्कार देण्यात येणार आहेत. आंबा महोत्सवामध्ये फळांची विक्री करण्यासाठी आंबा उत्पादकांना विनामूल्य स्टाॅल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महोत्सवात दि. १२ मे रोजी 'कृषी पर्यटन' या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून, पर्यटन विभागाचे अधिकारी तसेच यशस्वी कृषी पर्यटन केंद्रांचे संचालक मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद विनामूल्य असून ऑनलाइन नोंदणी करणे मात्र आवश्यक आहे. बसवंत कृषी पर्यटन महोत्सवामध्ये यशस्वी कृषी पर्यटन करणाऱ्या संस्थांना विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त शालेय विद्यार्ध्यांमध्ये कृषी पर्यटन तसेच आंबा या विषयांची जागृती व्हावी यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यांनाही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान बसवंत गार्डनमधील बसवंत मधमाशी उद्यान, प्रक्रिया उद्योग, आदर्श गाव सेवरगाव तसेच बसवंत पर्यटन केंद्रातील अनेक उपक्रमांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news