नाशिक : यंदा बुद्धपौर्णिमेला वन्यप्राणी प्रगणना होणार

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येवर झालेला परिणाम, वन्यप्राण्यांची संख्या घट अथवा वाढ, नवीन दाखल झालेले प्राणी आदींची माहिती जाणून घेण्यासाठी दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यप्राणी गणना केली जाते. मात्र, मागील दोन वर्षे कोरोनामुळे वन्यप्राणी गणना होऊ शकली नाही. आता राज्य कोरोना निर्बंधमुक्त झाले असून, वनविभागानेही वन्यप्राणी प्रगणनेची तयारी सुरू केली आहे. दि. 16 मे रोजी नाशिक वनवृत्तातील अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रात प्रगणना पार पडणार आहे.

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री लख्ख प्रकाशात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात वन्यप्राण्यांची गणना करणे सोपे असते. पूर्वी प्राण्याची विष्ठा तसेच ठशांचा अभ्यास करून वन्यप्राण्यांची गणना केली जात होती. आता पारंपरिक पद्धतीसोबतच गेल्या तीन वर्षांपासून कॅमेरा ट्रॅपिंगचा वापर केला जात आहे. गणनेदरम्यान मिळालेल्या आकडेवारीची सरासरी काढून, वनक्षेत्रातील प्राण्यांची आकडेवारी जाहीर केली जाते. त्याआधारे वन्यजिवांच्या संवर्धनाचा आराखडा तयार केला जातो. नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वरसह ममदापूर-राजापूर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, भंडारदरा, राजूर, यावल, आनेर, पाल आणि जामन्या या अभयारण्यांत प्रगणना केली जाणार आहे. वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणिप्रेमी रात्रभर पाणवठ्यावर बसून प्राण्यांच्या हालचालींचे निरीक्षण करणार आहेत. सोबतच पाणी पिण्यासाठी येणार्‍या प्राण्यांची माहिती नोंदविणार आहेत. सोमवारी (दि.16) रात्री 12 ते दुसर्‍या दिवशी रात्री 12 पर्यंत ही गणना होणार आहे. दरम्यान, या प्रगणनेविषयी वन्यजीवप्रेमींमध्ये मोठे आकर्षण असल्याचे चित्र आहे.

वन्यप्राणी संख्या समजणार : वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरीक्षण मनोरे अथवा मचाणाजवळून मार्गस्थ होत असल्याने त्यांची नोंद घेणे शक्य होते. संपूर्ण जिल्हा बिबट्याचे प्रवणक्षेत्र बनले असून, त्यांची ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याने वनविभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील बिबट्यांची संख्या समजण्यास मदत होणार आहे.

सध्या वन्यप्राणी गणनेची तयारी सुरू आहे. गणनेनंतर मिळणारी आकडेवारी वनविभागासाठी उपयुक्त ठरणारी आहे. 24 तासांत वन्यप्राणी गणना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गणनेसाठी वन्यजीवप्रेमींना सहभागी करून घेतले जाणार आहे. –  गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news