‘शाहू विचार जागर’ यात्रेचा आज प्रारंभ | पुढारी

‘शाहू विचार जागर’ यात्रेचा आज प्रारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त तमाम शाहूप्रेमींच्या वतीने ‘शाहू विचार जागर’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 3 मे रोजी सकाळी 9 वाजता, शिवाजीपेठेतील उभा मारुती चौकातून या यात्रेची सुरुवात होईल. शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेस प्रारंभ होणार आहे.

‘शाहू विचार जागर’ रथयात्रेचे स्वागत शिवाजीपेठेची शिखर संस्था असणार्‍या शिवाजी तरुण मंडळातर्फे करण्यात येणार आहे. शाहूंच्या जन्मभूमीतून निघणारी रथयात्रा त्यांचे निधन स्थळ असणार्‍या मुंबई पर्यंत प्रवास करणार आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे-मुंबई असा यात्रेचा मार्ग असणार आहे. कोल्हापुरातून सुरू होणारी यात्रा उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी,बिंदू चौक, महानगर पालिका, टाऊन हॉल, कसबा बावडा, शिये मार्गे टोप, वाठार, इस्लामपूर, पेठ नाका, कराडमार्गे सातारा येथे मुक्‍कामी जाणार आहे. दि. 4 रोजी पुणे येथे पोहोचल्यानंतर शनिवार वाड्यासमोर राजर्षी शाहू महाराजांनी महायुद्धात धारातिर्थी पडलेल्या सर्व समाजातील सैनिकांच्या स्मृतिसाठी उभारलेल्या स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यात येणार आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील पहिला पुतळा उभारणी छत्रपती शाहू महाराज यांनी केली. तेथे अभिवादन सभेनंतर मुक्‍काम होईल.

यात्रा दि. 5 मे रोजी सकाळी 12 वाजता, चेंबूर मुंबई येथे पोहोचेल. सायंकाळी 4 वाजता, खेतवाडी गल्‍ली नं. 13, कामाबाग चौक, गिरगाव येथील राजर्षी शाहू स्मृतिस्तंभाजवळ यात्रा नेण्यात येणार आहे. येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत स्मृतिस्तंभ लोकार्पण सोहळा होणार आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि माजी आ. मालोजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सोहळ्यास पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आदी उपस्थित राहाणार आहेत. शाहूप्रेमींनी या विचार यात्रेत कर्तव्य भावनेने सहभागी होण्याचे आवाहन स्मृतिशताब्दी समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक व उपाध्यक्ष बबनराव रानगे यांनी केले आहे.

Back to top button