अक्षय्यतृतीयेचा भावार्थ | पुढारी

अक्षय्यतृतीयेचा भावार्थ

अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. ‘कालविवेक’ या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला ‘आखा तीज’ असेही म्हटले जाते. अक्षयतृतीया या उत्सवाचे पारंपरिक संदर्भ लक्षणीय आहेत. त्यामागे इतिहास, परंपरा व विज्ञान यांचा मनोज्ञ संगम घडून आला आहे.

या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने सहकार्य केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो. महर्षी व्यासांनी श्री गणेशाच्या सहाय्याने महाभारतासारखे महान काव्य रचले. त्याप्रमाणे वर्तमान युगातही नव्या ज्ञानरचना या पवित्र दिवसाच्या शुभमुहूर्तावर केल्या पाहिजेत, असा आग्रह धरला जातो तो सार्थ होय.

‘अक्षय्य’ या शब्दाचा अर्थ ‘कधीही न संपणारा’ असा होतो. म्हणूनच असे म्हटले जाते की, ‘अक्षय्यतृतीया’ हा असा सण आहे की, ज्याचे भाग्य आणि शुभ फल कधी संपुष्टात येत नाही. या दिवशी सुरू केलेले कार्य माणसाला जीवनभर कधीच नष्ट न होणारे शुभ फल प्रदान करते. या दिवशी लोक जेवढे पुण्यकर्म करतील, जेवढा दानधर्म करतील, त्याचे फळ त्यांना आयुष्यभर मिळत राहते, असे मानले जाते. शुभ फलाचा हा प्रभाव कधीच संपुष्टात न येणारा असतो. अक्षय्यतृतीया हे हिंदू समाजातील एक पावन पर्व मानले जाते. हिंदू समाजात हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

विष्णूने परशुरामाच्या रूपात या दिवशी अवतार घेतला होता. अन्य आख्यायिकांनुसार, त्रेतायुग सुरू झाल्यानंतर पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाली. श्री अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवसही अक्षय्यतृतीया हाच मानला जातो. म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा देवीचे पूजन केले जाते.

दक्षिणेत या दिवसासंबंधी काही वेगळ्या कथा सांगितल्या जातात. तेथील मान्यतांनुसार, देवांचे खजिनदार कुबेर यांनी शिवपुरम येथे शंकराची आराधना करून या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकराने कुबेराला वरदान मागण्यास सांगितले. आपले धन आणि संपत्ती लक्ष्मीकडून आपणास परत मिळावी, असे वरदान कुबेराने मागितले, तेव्हा शंकराने कुबेराला श्रीलक्ष्मीची आराधना करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून आजअखेर दरवर्षी अक्षय्यतृतीयेला श्रीलक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पूजागृहात श्रीविष्णू, श्रीलक्ष्मी यांच्यासमवेत श्रीकुबेराचेही चित्र लावले जाते.

अक्षय्यतृतीयेलाच महाभारत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ झाल्याचे मानले जाते. याच दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला ‘अक्षय्य पात्र’ मिळाले होते. या पात्राचे वैशिष्ट्य असे की, यातील भोजन कधीही संपत नसे. या पात्राच्या सहाय्याने युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरिबांना आणि भुकेल्या लोकांना भोजन देऊन मदत करीत असे. त्यामुळेच या दिवशी केला जाणारा दानधर्म महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी केलेल्या पुण्याचे फळ कधीच न संपणारे असते, असे मानले जाते. दानशूर माणसाचे भाग्य या दिवशी केलेल्या दानामुळे वर्षांनुवर्षे वाढतच राहते. महाभारतात अक्षय्यतृतीयेसंबंधी आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. दुःशासनाने याच दिवशी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि श्रीकृष्णाने द्रौपदीला कधीही न संपणारे वस्त्र प्रदान केले होते. अक्षय्यतृतीयेसंबंधी आणखी एक रोचक कथा सांगितली जाते.

भारतातील ओडिशा प्रांतात अक्षय्यतृतीया हा शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी शेतकरी आपले शेत नांगरण्यास सुरुवात करतात. ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथपुरी येथील श्री जगन्नाथाची रथयात्रा याच दिवशी काढली जाते. वेगवेगळ्या प्रांतांत या दिवसाचे वेगवेगळे महत्त्व मानले जाते. पश्चिम बंगालमध्ये याच दिवशी श्रीगणेश आणि श्रीलक्ष्मीचे पूजन करून व्यापारी आपल्या हिशेबाच्या वह्या लिहिण्यास प्रारंभ करतात. ही प्रथा ‘हलखता’ नावाने ओळखली जाते. पंजाबातही या दिवसाला मोठे महत्त्व आहे. अक्षय्यतृतीयेला जाट परिवारातील पुरुष ब्राह्ममुहूर्तावर आपल्या शेतात जातात. शेताच्या वाटेवर जितके अधिक संख्येने पशुपक्षी शेतकर्‍याला दिसतील, तोच शुभशकुन मानला जातो.

जैन धर्मातील पहिल्या चोवीस तीर्थंकरांपैकी एक असणारे ऋषभदेव यांनी आपल्या 101 मुलांमध्ये राज्य वाटून दिले आणि संसाराच्या मोहमायेचा त्याग केला. सहा महिने अन्नपाणी न घेता त्यांनी तपश्चर्या केली. त्यानंतर भोजनाच्या अपेक्षेने ते ध्यानगृहाच्या बाहेर येऊन बसले. जैनी संत आहाराची प्रतीक्षा करू लागले. ऋषभदेव यांना राजा समजून लोकांनी त्यांना सोने, चांदी, हिरे, रत्ने आणून दिली. त्याचबरोबर काहींनी हत्ती, घोडे, कपडे दान म्हणून त्यांना दिले. परंतु ऋषभदेव यांना यापैकी काहीच नको होते. भोजनासाठी त्यांना थोडे अन्न हवे होते. त्यामुळे ते पुन्हा एक वर्ष तपश्चर्येसाठी गेले आणि त्यांना वर्षभर उपवास करावा लागला.

एक वर्षानंतर राजा श्रेयांश यांनी पूर्वजन्मीचे विचार जाणण्याच्या आपल्या शक्तीद्वारे ऋषभदेव यांची इच्छा जाणली आणि त्यांचा उपास सोडविण्यासाठी त्यांना उसाचा रस पाजला. तो दिवस अक्षय्यतृतीयेचाच होता. तेव्हापासून तीर्थंकर ऋषभदेव यांच्या उपवासाचे महत्त्व जाणून जैन धर्मीयांकडून या दिवशी उपवास धरला जातो आणि उसाचा रस पिऊन तो सोडला जातो. या प्रथेला ‘पारणा’ असे म्हणतात.
अक्षय्यतृतीयेला श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या छोट्याशा दानाचेही मोठे पुण्य लाभते. शुभकार्यासाठी हा दिवस अत्यंत लाभदायक मानला जातो.

अक्षय्यतृतीयेचे पारंपरिक संदर्भ लक्षणीय आहेत. त्यामागे इतिहास, परंपरा व विज्ञान याचा मनोज्ञ संगम घडून आला आहे. हा दिवस ज्ञान परंपरेचा सुवर्णयोग मानला जातो. अक्षय्यतृतीयेला संपादन केलेले पुण्यही अक्षय्य असते, अशी मान्यता आहे.

– सु. ल. हिंगणे,
अध्यात्म अभ्यासक

Back to top button