महाराष्ट्रातील सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी : पालकमंत्री छगन भुजबळ | पुढारी

महाराष्ट्रातील सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सुधारणांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा सातत्यपूर्ण करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे (दि.1) मुख्य ध्वजारोहण सोहळा पालकमंत्र्याच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी.शेखर-पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मनपा आयुक्त रमेश पवार आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, 1 मे 1960 रोजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याहस्ते स्वतंत्र महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवली. तेव्हापासून देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने नेहमीच सक्रीय सहभाग नोंदवला आहे. संत-महंत, ऋषिमुनीं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेवून प्राणांची पर्वा न करता अतोनात कष्ट, यातना सहन करणारे राज्यातील क्रांतीकारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाजसुधारकांचे विचार आजही आपल्या प्रगतीसाठी प्रेरक ठरत असल्याच्या भावना भुजबळांनी व्यक्त केल्या. कोरोनाच्या २ वर्षाच्या सावटानंतर यंदाचा महाराष्ट्र दिन निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याचे पूर्ण श्रेय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

पालकमंत्र्यांकडून समाधान 

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कुशल प्रशासनातून नाविण्यपूर्ण लोकोपयोगी संकल्पनांची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून नागरी सेवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्तालयास राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यासोबत संपूर्ण नाशिक विभागास 9 पुरस्कार प्राप्त झाले. प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक राज्यात दुसऱ्या स्थानी असल्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधानांच्या हस्ते मोडाळे (ता.इगतपूरी), दरी (ता.नाशिक) व गोंडेगाव (ता. दिंडोरी) मिळालेल्या पुरस्काराचा भुजबळांनी उल्लेख केला आहे.

वीजबिलांत 760 कोटींची सुट

जिल्ह्यात कृषिपंप विज धोरणांतर्गत 760 कोटींची विजबिलांमध्ये सूट देण्यात आली. यात 1 लाख 83 हजार 421 शेतकऱ्यांनी आपली उर्वरीत थकबाकी भरून सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील 7 हजार 310 शेतकऱ्यांना शेतीपंपाकरिता वीज जोडणी देण्यात आली. तसेच जिल्ह्यात सेवाहमी कायद्यांतर्गत 35 सेवा विद्यार्थ्यांसाठी तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या 70 सेवा अशा 105 सेवा अधिसूचित करून त्या लागू करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

जिल्ह्यासाठी १००८.३१ कोटींची निधी

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेत 1008.13 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. याअंतर्गत सर्वसाधारण योजनांसाठी 600 कोटी, आदिवासीसाठी 308.13 कोटी व अनुसूचित जाती उपयोजनांसाठी 100 कोटींचा समावेश आहे. देवसाने माजंरपाडा वळण योजना महाराष्ट्र शासनाची पथदर्शी व महत्वाकांक्षी योजना आहे. लघुपाटबंधारे विभागाने 3450 मीटर लांबीचे मातीचे धरण बांधून 8960 मीटरच्या मुख्य वळण बोगद्याद्वारे तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button