धुळे : पीक कर्ज वितरणासाठी 710 कोटी रुपयांचे उद्दीष्ट - पालकमंत्री अब्दुल सत्तार | पुढारी

धुळे : पीक कर्ज वितरणासाठी 710 कोटी रुपयांचे उद्दीष्ट - पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे, पुढारी वृत्तसेवा : आगामी पावसाळा चांगला असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यामुळे खरीप हंगामाची पूर्व तयारी करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. सन 2022- 23 मध्ये 4 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी बि- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध व्हावीत म्हणून पीक कर्ज वेळेत वितरणाच्या सूचना सहकार विभागाच्या माध्यमातून संबंधितांना दिल्या असून यंदा 710 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर प्रदीप कर्पे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे उपस्थित होते. प्रारंभी पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री सत्तार यांनी संचलनाचे निरीक्षण केले. पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांनी संचलनाचे नेतृत्व केले.

पालकमंत्री सत्तार म्हणाले, गेली दोन वर्षे सर्वचजण कोरोना नावाच्या विषाणूमुळे भयभीत झालो होतो. या दोन वर्षांच्या कालावधीत विविध निर्बंध लागू होते. यंदाच्या महाराष्ट्र दिनाला तशी स्थिती नाही. यंदा आपण मोकळा श्वास घेत आहोत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारची मोठी जमेची बाजू आहे. त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. आधी कोरोनाला रोखले. त्याबरोबरच लसीकरण सुरू केले. त्याचेच सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळत आहेत. असे असले, तरी अद्यापही कोरोनाचे संकट संपुष्टात आलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावा. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस, बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी तातडीने लस घ्यावी, असेही आवाहन सत्तार यांनी केले.

कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मदतनिधी देण्याची कार्यवाही सुरू आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 16 बालकांना पाच लाख रुपयांचे मुदतठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने भरीव कामगिरी केली आहे. त्यांचेही पालकमंत्री सत्तार यांनी कौतुक केले.

एकीकडे कोरोनाचे संकट असताना नैसर्गिक संकटे आली. धुळे जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. संबंधितांना भरपाई देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये 28 टक्के जलसाठा शिल्लक आहे. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी 1 कोटी 24 लाख रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. धुळे जिल्ह्यातील 45 हजार 496 शेतकऱ्यांना 346 कोटी 27 लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. ही राज्य शासनाची मोठी उपलब्धी आहे.

धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा वार्षिक योजना सन 2022- 23 करीता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी रु.236 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेसाठी रु.118 कोटी रुपये, तर विशेष घटक योजनेसाठी रु.30 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून दळण- वळणाच्या सुविधा, पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य, शैक्षणिक सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येईल.

प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळावे हाच महाविकास आघाडी सरकारचा ध्यास आहे. धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत ‘ब’ यादीत 46 हजार 471 घरकुलांचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत 40 हजारांवर घरकुले पूर्ण झाली आहेत. महाआवास अभियानांतर्गत धुळे जिल्ह्याची प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत शबरी आवास योजनेत द्वितीय क्रमांकाने निवड झाली. या योजनेच्या ‘ड’ यादीत जिल्ह्याला 18 हजार 34 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. सन 2021- 22 मध्ये 9 हजार 887 लाभार्थ्यांना ऑनलाइन मंजुरी देण्यात आली आहे.

महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान आपल्या जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाख 20 हजार 479 एवढ्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मोबाईल ॲपद्वारे ई- पीक पाहणी आज्ञावली विकसित केली आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सक्रिय आणि व्यापक सहभाग अपेक्षित आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील 2 लाख 99 हजार 954 शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणीत सहभाग नोंदविला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे. त्याबरोबरच राज्य शासनाने नवीन नमुन्यातील सातबारा शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 3 लाख 22 हजार 822 शेतकऱ्यांना तीन लाख 74 हजार 343 एवढ्या संख्येने सातबारा उताऱ्याचे वाटप केले आहे.

राज्य शासनाच्या विविध सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी 35, तर शिक्षकांसाठी 70 सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केल्या आहेत. शिक्षण विभागाच्या एकूण 105 सेवा सेवा हमी कायद्यात समाविष्ट झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालकांना लाभ होवून प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान होणार आहे असे त्यांनी सांगितले.

गुणवंतांचा सत्कार
पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते यावेळी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यात धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे विजय आबा देवरे, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्राप्त संयुक्त वन समिती आमोदा, ता. साक्री (प्रथम), गुऱ्हाळपाणी, ता. शिरपूर (द्वितीय), बळसाणे, ता. साक्री (तृतीय), लघुउद्योजक जिल्हा पुरस्कार विजेते राजेश गिंदोडीया व सिद्धार्थ गिंदोडिया (मे. राजसिद्धी इंडस्ट्रीज), वैशाली अविनाश पाटील (मे. आदित्य अॅग्रो इंडस्ट्रीज, 2018), कुवर इंजिनिअर्स ॲण्ड स्कायटेक आरओ टेक्निक, दिनेश कुवर, मे. पार्थ वायर प्रॉडक्ट, पराग श्राफ (2019), आदर्श तलाठी मनीषा सखाराम ठाकरे (सजा वणी), राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहामध्ये 15 वर्षे उत्कृष्ट गुणवत्ता सेवेबद्दल संदीप बाळकृष्ण सोनवणे, नीलेश जगन्नाथ झाल्टे, घनश्याम सुधाकर व्यवहारे, नीलेश शिवाजी देवरे, उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस कर्मचारी प्रवीण दामोदर अमृतकर, सिद्धप्पा हरिभाऊ गवळी, मुकेश मधुकर अहिरे, संदीप साहेबराव पाटील, जितेंद्र गोकुळसिंग परदेशी यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपल्हाधिजिकारी गोविंद दाणेज (रोहयो), सुरेखा चव्हाण, महेश जमदाडे (भूसंपादन), जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, डॉ. अरविंद अंतुर्लीकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button