नाशिक : जिल्ह्यात 31 गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात 31 गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एप्रिलच्या अखेरीस जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यातील 31 गावे-वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. प्रशासना कडून 18 टँकरद्वारे या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाईच्या झळा येवल्याला जाणवत असून, तालुक्यात सात टँकर सुरू आहेत.

जिल्ह्यात ऊन तापले असून, तापमानाचा पारा 41 अंशांवर जाऊन ठेपला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे सकाळी 9 नंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दुपारी 12 ते 4 या काळात ऊन अधिक जाणवत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत आहेत. ग्रामीण भागालादेखील उन्हाचे चटके बसत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सदयस्थितीत जिल्ह्यात 31 ठिकाणी 18 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी याच काळात 48 गावे-वाड्यांना 24 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. येवला तालुक्यातील 15 गावे-वाड्यांसाठी सर्वांत जास्त सात टँकर धावताहेत. त्या खालोखाल बागलाणला आठ गावा-वाड्यांची तहान पाच टँकरद्वारे भागविली जातेय. सिन्नरमध्ये दोन गावांसाठी दोन, इगतपुरीत तीन ठिकाणी एक तर चांदवड, देवळा व मालेगावमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन कामकाज ठप्प पडत आहे.

हेही वाचा :

Back to top button