विदेशी गुंतवणुकीचा दिलासा

विदेशी गुंतवणुकीचा दिलासा
Published on
Updated on

भारताशी मैत्री करण्यासाठी अनेक देश उत्सुक आहेत. गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबर या काळात दहा देशांनी भारतात मोठी रक्‍कम गुंतवली आहे. यानुसार भारत आगामी काळात आर्थिक सत्ता म्हणून नावारूपास येत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारताच्या परराष्ट्र संबंधात चांगली सुधारणा होत आहे. जपानचे पंतप्रधान फिमियो किशिदा यांनी मार्च महिन्यात भारताचा दौरा केला. यात त्यांनी येत्या पाच वर्षांत जपानने भारतात 3.2 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली. आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताचा दौरा केला. या दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाखेरीस मुक्‍त व्यापार कराराला अंतिम रूप देण्याबाबत आश्‍वासन दिले. या आधारावर उभय देशांतील संबंध आणखी वृद्धिंगत होतील, असा विश्‍वास बाळगला जातआहे.
भारताची यशस्वी जागतिक रणनीती आणि बदलेल्या द‍ृष्टिकोनाचा परिपाक म्हणजे भारताबाबत अन्य देशांचा विश्‍वास वाढू लागला आहे. गेल्या काही वर्षांत भारतात गुंतवणूक करणार्‍या दहा प्रमुख राष्ट्रांच्या भूमिकेतून एक गोष्ट लक्षात येईल की, भारताशी मैत्री करण्यासाठी अनेक देश उत्सुक आहेत. गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबर या काळात दहा देशांनी भारतात मोठी रक्‍कम गुंतवणूक केली आहे. यानुसार भारत आगामी काळात आर्थिक सत्ता म्हणून नावारूपास येत असल्याचे दिसून येत आहे. या दहा महिन्यांत सिंगापूर 86,760 कोटी, अमेरिका 55,811 कोटी, नेदरलँड 19,723 कोटी, ब्रिटन 10,661 कोटी, जपान 6,814 कोटी, यूएई 6,277 कोटी, जर्मन 4,326 कोटी आणि सायप्रम 1,037 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत किंवा प्रक्रिया सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना भारत हा जगात सर्वाधिक प्रत्यक्ष परकी गुंतवणूक (एफडीआय) आणणारा देश ठरला असल्याचे सांगितले.

आता आपण जपानचे पंतप्रधान आणि नंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भारत दौर्‍याबाबत बोलू. सध्याच्या काळात विशेषत: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना दोन्ही देशांच्या प्रमुखांनी केलेला भारत दौरा हा महत्त्वाचा आहे. या भेटीने शेजारचे चीन आणि पाकिस्तान अस्वस्थ झाले आहेत. भारत आणि ब्रिटनची जवळीक पाहिल्यास ती दीर्घकाळापर्यंत सर्वांच्या स्मरणात राहू शकते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौर्‍यातून एक बाब सिद्ध झाली आणि ती म्हणजे, ब्रिटन भारतात आर्थिक सहकार्य वाढवण्यास इच्छुक आहे. त्याचबरोबर संरक्षणबाबतीतही ब्रिटन भारतासमवेत सहकार्याची भावना ठेवत आहे. रशियावरील भारताचे अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी ब्रिटन प्रयत्नशील आहे. परंतु, देशहित पाहून भारत ज्या रितीने वाटचाल करत आहे, ते खरोखरच उल्लेखनीय आहे. जॉन्सन यांच्या दौर्‍याचे यश म्हणजे ब्रिटन भारताला एक ओपन जनरल एक्स्पोर्ट लायसन्स देणार असून त्यानुसार संरक्षण साहित्य खरेेदीत आणि पुरवठ्यात कमी वेळ लागेल. याशिवाय ब्रिटन लढाऊ जेट विमान तयार करण्यासाठी भारताला मदत करणार आहे. हिंद महासागरात भारताची शक्‍ती वाढवण्यासाठी ब्रिटन मदत करू इच्छित आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटिलिजिन्स आणि आरोग्य क्षेत्रात ब्रिटनने गुंतवणूक वाढवण्याची भूमिका मांडली आहे. एवढेच नाही, तर दोन्ही देशांत या वर्षाखेरीस एक मुक्‍त व्यापार करार होणार आहे. अशा प्रकारचा करार अगोदरच होणे गरजेचे होते. परंतु, आता ब्रिटन या दिशेने पुढे जात असेल, तर भारताचे जागतिक राजकारणात वाढलेले महत्त्व नाकारता येणार नाही आणि दुर्लक्ष करता येणार नाही. भारताच्या सीमेवर चीनच्या कुरापती आणि पाकिस्तानकडून काश्मीर खोर्‍यात सुरू असलेल्या घुसखोरीला बर्‍यापैकी आळा बसला आहे. त्यामुळे जागतिक शांततेसाठी जगातील अनेक देश भारतासमवेत असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थात, भारताचे रशिया, इस्रायल, जपान, कॅनडा, फ्रान्स, नेपाळ आणि भूतानशी असेले संबंध जगजाहीर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news