रात्रीतून कुटुंब पडलं आजारी ; आजोबा-नातू दगावले, आरोग्य विभागही बुचकळयात | पुढारी

रात्रीतून कुटुंब पडलं आजारी ; आजोबा-नातू दगावले, आरोग्य विभागही बुचकळयात

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील महड गावातील एकाच शेतकरी कुटुंबातील चौघांची प्रकृती अचानक खालावून आजोबा-नातू दगावले. तर, मायलेक अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना नेमकी कशाची बाधा झाली अन्, मृत्यू कसा ओढवला, याचे कोडे आरोग्य विभागालाही पडल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

बागलाण तालुक्यात महड हे 100 टक्के कृषिग्राम आहे. अनेकांची कोरडवाहू शेतजमीन आहे. गावातील शेतकरी बाळू शिवबा सोनवणे हे नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काबाडकष्ट करून 21 तारखेला रात्री शेतातील एका पत्र्याच्या खोलीत कुटुंबासोबत झोपले. दुसर्‍या दिवशी पहाटे झोपेतून उठल्यावर सर्वांना अस्वस्थ वाटू लागले. डोळे उघडत नव्हते, हातपायात त्राण उरले नाही. त्यामुळे त्यांना मुलगा अनिल याने तत्काळ प्रथम मालेगाव व तेथून नाशिकला उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान, बाळू सोनवणे (68) यांचा व नातू हरिभाऊ अनिल सोनवणे (12) याची प्राणज्योत मालवली. कोणताही आजार नाही , सर्पदंश नाही की विषबाधा, तरीसुद्धा मृत्यू नेमका ओढवला कसा, असा प्रश्न आरोग्य विभागालादेखील पडला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा शवविच्छेदन अहवालदेखील नॉर्मल आला आहे. त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले नाही. घरातील अजून सदस्य सरिता अनिल सोनवणे (16) व नंदाबाई अनिल सोनवणे (40) या दोघांवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नंदाबाईंनी धास्त खाल्ली असून, मुलीची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येते. निदानच होत नसल्याने नेमकी कोणती उपचार पद्धती अवलंबावी, असा प्रश्न डॉक्टरांनी पडला आहे. या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.

मृत्यूचे कारण व रहस्य वैद्यकीयशास्त्राला आव्हान देणारे ठरले आहे. शासकीय स्तरावरून या कुटूंबाला भरीव मदत व अद्यावत उपचार मिळावे, यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे तर्कवितर्क लढविले जात असून, कुलर, कीटकनाशक अशा वावड्या उठत आहे. त्यामागील सत्य प्रशासनाने उलगडावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button