नाशिक : पेस्ट कंट्रोल ठेक्याची आयुक्तांनी मागवली कुंडली | पुढारी

नाशिक : पेस्ट कंट्रोल ठेक्याची आयुक्तांनी मागवली कुंडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पेस्ट कंट्रोलचा ठेका 19 कोटींवरून थेट 46 कोटींवर पोहोचल्याने या वादग्रस्त ठरलेल्या ठेक्याची सविस्तर माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मलेरिया विभागाकडून मागविली आहे. आयुक्तांनी या ठेक्याची इत्थंभूत कुंडलीच मागविल्याने ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍यांची आता भंबेरीच उडाली आहे.

शहरात औषध आणि धूर फवारणी करण्याबाबत मनपाने काढलेल्या फेरनिविदेवरील स्थगिती न्यायालयाने उठवून या ठेक्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्तांना असल्याचे सांगितले आहे. यामुळे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी या ठेक्याची माहिती मागविल्याने अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. डेंग्यू, चिकुगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाकडून ठेकेदारामार्फत औषधांची फवारणी केली जाते. परंतु, ठेकेदारांकडून मात्र कागदावरच फवारणी होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी महासभा तसेच स्थायी समितीच्या सभेत केल्या होत्या. आधीच्या ठेक्याची मुदत संपल्याने नवीन ठेका देण्याकरिता मलेरिया विभागाने तीन वर्षांचा ठेका 19 कोटींवरून थेट 46 कोटींवर नेऊन ठेवला. एका विशिष्ट ठेकेदारालाच ठेका पुन्हा मिळावा, यासाठी सोयीच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या होत्या. यामुळे वादात सापडलेल्या या ठेक्याची निविदा प्रक्रियाच तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी रद्द केली होती.

त्यावर संबंधित ठेकेदाराने उच्च न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळविली. गेली दीड ते दोन वर्षे ही स्थगिती होती आणि स्थगिती उठविण्यासाठी मलेरिया विभागाकडूनही तेवढे प्रामाणिक प्रयत्न झाले नाही. याबाबत स्थायी समितीच्या सभेतही अनेकदा नगरसेवकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. दरम्यान, 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन फेरनिविदेला दिलेली स्थगिती तर उठविलीच, शिवाय निविदेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांनाच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळेच आता आयुक्त रमेश पवार यांनी या ठेक्याची कुंडलीच मागविली असून, ठेकेदारासदंर्भात असलेल्या तक्रारींची माहिती मागविली आहे.

हेही वाचा :

Back to top button