नाशिक : वाहनांच्या वेगावर ‘रडार’ ठेवणार लक्ष, पोलिस अधीक्षकांची माहिती | पुढारी

नाशिक : वाहनांच्या वेगावर ‘रडार’ ठेवणार लक्ष, पोलिस अधीक्षकांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वाधिक अपघात वेगवान वाहनांमुळे होत असतात. त्यामुळे वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी व वेगमर्यादा ओलांडणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी रडार लावण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील दोन मार्गांवर हे रडार दोन दिवस लावण्यात आले होते. परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील अपघातप्रवण मार्गांवर रडार लावण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

नाशिक ग्रामीणच्या हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून, त्यात दरवर्षी शेकडो नागरिकांचा अपघाती मृत्यू होत आहे. अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी इंटरसेप्टर वाहन, स्पीडगनमार्फत वाहनांचा वेग मोजला जातो. यात वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांना ई-चलनमार्फत दंड केला जातो. मात्र, या यंत्रणेमार्फत 10 सेकंदांत एका वाहनाचा वेग मोजला जात असल्याने इतर वाहने वेगाने पुढे जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, रडार यंत्रणेमार्फत येणार्‍या व जाणार्‍या दोन्ही मार्गांवरील अंदाजे दोन किलोमीटर अंतरावरील सर्व वाहनांचा वेग एकाच वेळी संकलित केला जातो. त्यात ज्या वाहनांनी वेग मर्यादा ओलांडली असेल त्या सर्व वाहनचालकांना ई-चलन मार्फत दंड केला जाऊ शकतो, असे पाटील यांनी सांगितले.

सुरुवातीस दोन ठिकाणी रडारची चाचणी करण्यात आली आहे. भविष्यात भाडेतत्त्वाने रडार घेऊन अपघातप्रवण मार्गांवर हे रडार लावले जातील. जेणेकरून सर्व वेगवान वाहनांवर लक्ष ठेवले जाईल. चालकांना पूर्वकल्पना देण्यासाठी सूचनाफलकही लावले जातील. चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
– सचिन पाटील,
पोलिस अधीक्षक

हेही वाचा :

Back to top button