मालेगाव काँग्रेस कमिटीचे लक्षवेधी भोंगा आंदोलन | पुढारी

मालेगाव काँग्रेस कमिटीचे लक्षवेधी भोंगा आंदोलन

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए’ ही प्रचारसभांमधील ऑडिओ क्लिप लावून मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीने मंगळवारी (दि. 26) लक्षवेधी आंदोलन केले. मोदींचा प्रश्न आणि त्यापाठोपाठ ‘नहीं हुए’ अशा घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध नोंदविला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोसमपुलाजवळील पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी सभांमध्ये श्रोत्यांना उद्देशून केलेल्या प्रश्नांना ध्वनिक्षेपावर वाजवून या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले. ‘आपका फायदा हुआ के नही हुआ?’, ‘आपके जेब में थोडा पैसा बचने लगा के नही’ या प्रश्नांना कार्यकर्त्यांनी जोशात नकारार्थी उत्तरे दिली. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

मोदी सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाईचा विस्फोट झाला आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅस, खाद्यतेले यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. उज्ज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून सिलिंडर देऊन रॉकेल बंद केले गेले. त्या गरिबांना आता गॅसही नाही आणि रॉकेलही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना, सरकारने कर लादून नागरिकांची लूट केली. अशा प्रकारे मागील सात वर्षांत तब्बल 22 लाख कोटी रुपयांची नफेखोरी झाली. कराशिवाय पेट्रोल 32.72 रुपये लिटर, तर डिझेल 30.46 रुपये लिटर आहे. डिझेलवर 820 टक्के, पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्युटी लावली आहे. भरमसाठ कर लावल्याने पेट्रोल दर 118 रुपये लिटरवर पोहोचले आहे. डिझेलही शतकपार गेले. इंधनामुळे वाहतूक खर्च वाढून महागाईचा आलेख उंचावला आहे. या अकार्यक्षम सरकारच्या विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांनी सांगितले.

या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, दत्तात्रेय खैरनार, संजय पवार, दत्तात्रेय वडक्ते, शशीकुमार पाटील, शशिकांत खैरनार, सतीश पगार, नितीन बच्छाव, वाय. के. खैरनार, वसंत शेवाळे, उमेश शेवाळे, मंगला तलवारे, शैला सोनवणे, डॉ. महेंद्र शिरोळे, संदीप निकम, एकनाथ कन्नर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button