सिन्नर : कणकोरीसह पाच गाव पाणी योजनेचा शुद्धीकरण प्रकल्प.
सिन्नर : कणकोरीसह पाच गाव पाणी योजनेचा शुद्धीकरण प्रकल्प.

नाशिक : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचा जलशुद्धीकरण प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद

Published on

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचा जलशुद्धीकरण प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही ग्रामस्थांनी या केंद्राची पाहणी केल्याने सदरचा प्रकार उजेडात आला आहे.

या योजनेसाठी भोजापूर धरणातून पाणी उचलले जाते. हे पाणी पुढे चास (रामवाडी) येथील जलशुद्धीकरण केंद्रात टाकून व प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते. यासाठी तुरटी मिसळून गाळ बसू देणे, विविध टाक्यांमधून त्याचे वर्गीकरण करणे, क्लोरिन, पोटॅशसह रासायनिक प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते.

मात्र, गेल्या 6 महिन्यांपासून शुद्धीकरण प्रकल्पातून पाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करताच थेट नागरिकांना पुरवठा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या नळाला येणार्‍या पाण्यात अळ्या, घाण येत असल्याने येथील काही ग्रामस्थांनी शुद्धीकरण प्रकल्पावर जाऊन पाहणी केली, तेव्हा पाणी शुद्धीकरणासाठी लागणारे वीजपंप बंद असून, त्यांना गंज आल्याचे बघायला मिळाले. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाण्यात पोटॅश, क्लोरिन मिसळण्यासाठी असलेल्या टाक्यांमध्ये केरकचरा पडलेला दिसून आला. धरणातून उचलले जाणारे पाणी नावापुरतेच शुद्धीकरण प्रकल्पावरून फिरवून कुठलीही प्रक्रिया न करता थेट नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जात असल्याचे निदर्शनास आले.

येथील टाक्यांमध्ये दारूच्या काही रिकाम्या बाटल्याही पडलेल्या दिसून आल्या. केंद्रावर एक सेवकही कार्यरत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याला पगार मिळाला नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा ही मूलभूत गरज भागवल्याशिवाय आरोग्यमानात सुधारणा होत नाही. कणकोरीसह नांदूरशिंगोटे, मानोरी, निर्‍हाळे, मर्‍हळ या गावांना या योजनेद्वारे दूषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

गेल्या काही दिवसांपासून नांदूरशिंगोटे गावातील नागरिकांच्या नळांमधून अळ्या,कचरायुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार योजनेच्या प्रकल्पावर पाहणी केली असता, येथील भोंगळ कारभार उघडकीस आला. गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याचे शुद्धीकरण न करताच, नागरिकांना थेट पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले. सधन नागरिक घरात फिल्टर बसवून यापासून वाचू शकतात. मात्र, गोरगरिबांनी काय करायचे? हा गोरगरिबांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
– सुरेश कुचेकर, तालुकाध्यक्ष, अण्णा भाऊ साठे फाउंडेशन

प्रकल्पावर पाण्याचा अपव्यय
उन्हाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असून, आताच भोजापूर धरणातील पाणीसाठा घटला आहे. असे असताना चास येथील या योजनेच्या शुद्धीकरण केंद्रातील टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी असलेल्या पाइपलाइनला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. पाणी चढवताना निम्मे पाणी या गळतीमुळे वाया जात असल्याचे दिसून आले. पाणीपुरवठा समितीवरील अध्यक्षांसह सदस्य शुद्धीकरण व इतर गोष्टींकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news