

प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा
हनीट्रॅप प्रकरणापाठोपाठ लोणी काळभोर येथील पर्यटक भोरे दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने महाबळेश्वर येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाबळेश्वर हे जगप्रसिध्द पर्यटन स्थळ असून येथील कायदा आणि सुव्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. पोलिसांच्या दुर्लक्षाने येथील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा भलत्याच गोष्टीत रस आहे. त्यामुळे महाबळेश्वरकर चिंतेत आहेत.
महाबळेश्वरात यापूर्वी कधी घडले नाहीत असे गुन्हे घडले आहेत. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळणे, हनीट्रॅप आणि आता पर्यटक दाम्पत्यावर भरदिवसा खूनी हल्ला, असे गुन्हे यापूर्वी शहरात कधीच घडले नाहीत. या सर्वच प्रकरणांत पोलिसांची भूमिका कायम संशयास्पद राहिली आहे. त्यामुळेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
पत्नीला जीवंत पेटवणारा आरोपी हा याच भागात दबा धरून बसला होता. अनेकांनी त्याला शहरात फिरताना पाहिले होते. परंतु, तो आरोपी पोलिसांना दिसला नाही. काही दिवसांनी आरोपीने आत्महत्या केली व हे प्रकरण बंद झाले. हनी ट्रॅप प्रकरणीही पोलिसांनी हलगर्जीपणा केला. त्यांनी पुराव्याकडे दुर्लक्ष करून महिलेला साथ दिली. त्यामुळे महिला येथील एका नागरिकाला लुटण्यात यशस्वी झाली. आता पर्यटक दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यातही पोलिसांनी तक्रार नाही म्हणून तपास नाही, हे धोरण स्वीकारले. जेव्हा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा शहराची अथवा परिसराची नाकेबंदी करायला हवी होती. या भागातील सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासायला हवे होते. ज्यांच्यावर हल्ला झाला ते गुन्हेगार तर नाहीत ना? याचाही तपास पोलिसांनी करायला हवा होता. अशा पोलिसांच्या हाती महाबळेश्वरचा कारभार हेच खरे नागरिकांच्या चिंतेचे कारण आहे.