राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, २९ तारखेपर्यंत जेलमध्ये राहणार | पुढारी

राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, २९ तारखेपर्यंत जेलमध्ये राहणार

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राणा दाम्पत्याला कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कारण, २९ तारखेपर्यंत ते तुरुंगात राहणार आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर २९ एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राणा दाम्पत्य तुरुंगातच असणार आहेत. दरम्यान, उत्तर देण्यासाठी सरकारला ३ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले होते.

दरम्यान, राणा दाम्पत्यावर 124 अ (राजद्रोह) कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणीस नकार दिल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली होती. आता राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. रवी राणा यांना तळोजा कारागृहात आणि नवनीत राणा यांची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती.

धार्मिक कारण पुढे करून दोन गटांमध्ये वैमनस्य वाढवणे व एकोप्याला बाधा निर्माण केल्याप्रकरणी उपेंद्र लोकेगावकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध 153 अ, 124 अ, 34 भादंवि सहकलम 37 (1), 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत त्यांना त्यांच्या खार येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही रात्री उशिरा सांताक्रूझ लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

Back to top button