नाशिक : उंटवाडी उड्डाणपुलाचे बांधकाम थांबवा : मनसे | पुढारी

नाशिक : उंटवाडी उड्डाणपुलाचे बांधकाम थांबवा : मनसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मनपातर्फे मायको सर्कल, संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध असून, उड्डाणपूल त्वरित रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर निकाल येईपर्यंत संबंधित उड्डाणपुलाचे बांधकाम थांबविण्याचे साकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे मनपा आयुक्त रमेश पवार यांना घातले. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे 3-4 पिढ्यांपासून उंटवाडी गावात वसलेली कुटुंबे व सिडको प्रकल्पग्रस्त 1000 ते 1500 छोटी-मोठी व्यावसायिक कुटुंबे पूर्णपणे देशोधडीस लागतील. तर स्थानिक जनतेचे श्रद्धास्थान प्राचीन म्हसोबा महाराज देवस्थान येथून हलवावे लागणार असून, हेरिटेज ट्री दर्जा प्राप्त 200 वर्षे जुन्या वटवृक्षासह तब्बल 588 डेरेदार वृक्षांची कत्तल होणार आहे. प्राचीन वटवृक्ष व इतर वृक्ष वाचविण्यासाठी उड्डाणपुलाचे सुधारित अलायनमेंट न करता, बांधकामाचा सुधारित कार्यारंभ आदेशही संशयास्पद असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सुधारित कार्यारंभ आदेश रद्द करून उड्डाणपुलाचे बांधकाम तत्काळ थांबवून नाशिककरांच्या पैशांचा अपव्यय टाळण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. रतनकुमार इचम, अंकुश पवार, दिलीप दातीर, योगेश शेवरे, नितीन माळी, विजय आगळे, ललित वाघ, पंकज दातीर आदी पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे अपुर्‍या निधीमुळे जनहिताची अनेक कामे खोळंबलेली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

हेही वाचा :

Back to top button