नााशिक : सातपूरला गॅस सिलिंडरचा भडका; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर | पुढारी

नााशिक : सातपूरला गॅस सिलिंडरचा भडका; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा : येथील राधाकृष्णनगरमधील सरोदे संकुलमध्ये बुधवारी (दि. २०) झालेल्या गॅस सिलिंडरच्या भडक्यात आईचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर भाजल्याची घटना घडली.

याबाबतच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अर्चना ललेंद्र सिंह (40, रा. सरोदे संकुल, राधाकृष्णनगर, सातपूर) या किचनरूमऐवजी बेडरूममध्ये तात्पुरत्या स्वरूपातील गॅस व सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसवर आम्लेट करीत होत्या. त्यावेळी गॅसनळीतून गॅस लीकेज होऊन आगीचा भडका उडाला. बेडरूममध्ये लाकडी कपाट, गादी, कपडे असल्याने या वस्तूंनी पेट घेतला आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. किचनरूममध्ये असलेल्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर, हॉलमध्ये असलेले ललेंद्र सिंग यांनी अर्चना यांना आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीची तीव्रता अधिक असल्याने यात अर्चना या ९० टक्के भाजल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर मुलगी आस्था (१६) ही २० टक्के भाजली असून, तिच्यावर अशोकनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

अर्चना यांचे पती ललेंद्र सिंह यांनी आगीतून दोघींना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अर्चना या घाबरल्याने आगीतून बाहेर न पडल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यावेळी घरात मयत अर्चनासह मुलगी आस्था व अजून एक मुलगी, आजी, ललेंद्र सिंह होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गॅसची नळी जीर्ण झाल्याने वायू गळती होऊन ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येते.

हेही वाचा:

Back to top button