अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा नाशिकमध्ये निषेध | पुढारी

अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा नाशिकमध्ये निषेध

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इस्लामपूर येथे आयोजित संवाद यात्रेच्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा नाशिकमधील पुरोहित संघ व साधू महंतांनी जाहीर निषेध नोंदवत मिटकरी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. १९) इस्लामपूर येथे संवाद यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत हजारो जनसमुदायासमोर आमदार मिटकरी यांनी काही स्तोत्र म्हणून दाखवत टिंगल उडविण्याचा प्रयत्न केला. मिटकरी यांच्या या कृतीचा व त्यांच्या वक्तव्याचा देशभरात निषेध केला जात असून, नाशिकमध्येही त्याचे पडसाद उमटले. बुधवारी (दि. २०) सायंकाळी गोदाघाट रामकुंड येथे पुरोहित संघ व साधू महंतांनी मिटकरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मिटकरी यांनी बेताल व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ते ही कृती करत असताना राज्याचे दोन मंत्री व्यासपीठावर होते त्यांनी मिटकरी यांना थांबवायला हवे होते, मात्र त्यांनी हसून त्यांना एकप्रकारे पाठिंबा दिला. मिटकरी यांनी तातडीने जाहीर माफी मागावी व राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, महंत अनिलशास्त्री देशपांडे, मुकुंद खोचे, माणिक शिंगणे, देशपांडे गुरुजी, अनिल शुक्ल, राजाभाऊ गायधनी, महाजन गुरुजी, श्याम नाचन, कुलकर्णी गुरुजी, विनोद थोरात, जगन पाटील आदींसह भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button