नाशिक : प्रशासकीय अनास्था : वर्षभरानंतरही बहिणींची ताटातूट कायम | पुढारी

नाशिक : प्रशासकीय अनास्था : वर्षभरानंतरही बहिणींची ताटातूट कायम

नाशिक : नितीन रणशूर
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील गॅसगळती दुर्घटनेत अनेकांनी जवळचे व्यक्ती गमावले. दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही मातृछत्र हरपलेल्या दिल्ली येथील शर्मा कुटुंबातील पाच बहिणींची ताटातूट कायम आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे एक बहीण नाशिकमध्ये, तर चार बहिणी दिल्लीत वास्तव्यास आहेत. शासनाच्या आर्थिक मदतीची फुंकरही या बहिणींच्या दुरावलेल्या नात्याला पुनर्जीवित करण्यात अपयशी ठरल्याचे वास्तव आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत होती. या लाटेत सातपूर परिसरात राहणार्‍या पूजा लखन सदार यांची दिल्लीमध्ये राहणारी आई आशा जयपाल शर्मा ह्या बाधित झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी द्वारका परिसरातील मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले होते. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. ऑक्सिजन पातळीवर पूर्वपदावर येत असतानाच गळतीच्या रूपाने शर्मा यांच्यावर काळाने घाला घातला. आशा शर्मा यांच्या निधनानंतर पूजा यांच्यासह सोनम, छाया, लक्ष्मी, हिरा या पाच बहिणींच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरपले. अंत्यविधीनंतर पूजा वगळता इतर चौघींना पुन्हा दिल्ली महिला व बालकल्याण विभागाने पीव्हीसी धर्मशाळेत धाडले. तर पूजा व त्यांच्या पतीचा चौघींना नाशिकमध्ये आणण्यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली. मात्र, त्यात अपयश आल्याने वर्षभरानंतरही पूजा यांच्यापासून लहान चार बहिणी दुरावलेल्या आहेत.

स्थानिक महिला व बाल कल्याण विभागाकडूनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, पूजा सदार यांना चारही बहिणींची फोनद्वारे नियमित विचारपूस करावी लागते. तसेच त्यांना भेटण्यासाठी दिल्ली गाठावे लागते. मात्र, सदार यांचे पतीही खासगी नोकरी करत असल्याने दिल्ली जाणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे चौघींना नाशिकमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी दाम्पत्याने केली आहे.

गेली वर्षभर चारही बहिणी दिल्लीच्या धर्मशाळेत राहतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे अवघड होऊन जाते. दर दोन महिन्यांनी दिल्लीला जाऊन त्यांची भेट घ्यावी लागते. त्यामुळे तारांबळ उडते. त्या पार्श्वभूमीवर
चौघींना नाशिकमध्ये स्थलांतरित करावे.
– पूजा सदार,
दुर्घटनाग्रस्त

मनपाच्या मदतीची प्रतीक्षा…
राज्य शासनाने तसेच मनपाने डॉ. हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील वारसांना पाच लाखांची आर्थिक मदत घोषित केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून आशा शर्मा यांच्या वारसांना पाच लाख देण्यात आले आहेत. मात्र, वारस निश्चित नसल्याचे सांगत मनपाकडून अद्यापही त्यांना आर्थिक मदत करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

Back to top button