नाशिक : चाकूचा धाक दाखवून शिर्डी मार्गावर लूट | पुढारी

नाशिक : चाकूचा धाक दाखवून शिर्डी मार्गावर लूट

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा: सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावीच्या पाहुणचार हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कामगाराला चाकूचा धाक दाखवून मोटारसायकलसह ऐवज लुटून पोबारा केला.

लिंगटांगवाडी येथे रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून चारचाकी पिकअप गाडी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 19) मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान दुसरी घटना घडली. संदीप रामनाथ घोटेकर (31, रा. दुसंगवाडी) नेहमीप्रमाणे मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील रिंग गिअर कंपनीतून काम संपवून परतत असताना ही घटना घडली. यावेळी चोरट्यांनी घोटेकर यांना चाकूचा धाक दाखवून धक्काबुक्की करून रोख दीड हजार रुपये, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व त्यांची प्लॅटिना मोटारसायकल (क्र. एमएच 15 जीएम 8303) चोरून शिर्डीच्या दिशेने पोबारा केला. संशयित चोरटे हे 35 ते 40 वयोगटातील असून, ते मराठी बोलत होते, असे घोटेकर यांनी पोलिसांना सांगितले. घोटेकर यांनी रात्री एकच्या दरम्यान कसेबसे वावी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. सिन्नर-शिर्डी मार्गावर काही दिवसांपासून थांबलेले गुन्हे पुन्हा वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button