

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांनंतर नाशिक शहरातील मनपाचे जलतरण तलाव मंगळवारपासून खुले करण्यात आले. मात्र, सातपूर येथील जलतरण तलावाची तयारी पूर्ण न झाल्याने पहिल्याच दिवशी सभासदांना निराश होऊन माघारी फिरावे लागले आहे. दरम्यान, संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी दिनकर पाटील यांनी केली आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सातपूर मनपाचा तरण तलाव बंद आहे. मात्र, कोरोना ओसरल्याने तरण तलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात मनपा प्रशासनाने आदेश दिले होते. त्यानुसार, मंगळवारपासून (दि.19) शहरातील सर्व तरण तलाव उघडण्यात आले. यास सातपूरचा तरण तलाव अपवाद ठरला. येथील तलावाची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सातपूर परिसरातील सभासदांना माघारी फिरावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तरी लवकरात तलावाची स्वच्छता करून तलाव सुरू करण्याची मागणी बजरंग शिंदे, आबा महाजन, मनोज सालुंखे, बाळासाहेब रायते, दिलीप गिरासे, प्रकाश महाजन, महेश मोरे, महेश महाजन, प्रदीप येवले आदी सभासदांनी केली आहे.
सातपूर परिसरातील समस्यांबाबत पंधरा दिवसांपूर्वीच निवेदन दिले होते. त्यात तरण तलाव सुरू करण्याचीही मागणी केली होती. आयुक्तांनी आदेश दिलेले असताना तरण तलाव सुरू का झाला नाही, याबाबत संबंधित अधिकारी दोषी धरून कारवाई करावी. तलावाची स्वच्छता करून सुरू करावा अन्यथा आंदोलन केले जाईल. – दिनकर पाटील, माजी सभागृहनेते
सकाळी तरण तलाव उघडतील म्हणून आम्ही आलो. मात्र, मनपा यंत्रणेची कोणतीही तयारी येथे दिसून आली नाही. पाण्याची स्वच्छता झाली नसल्याने जवळपास 100 वर सभासदांना मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे माघारी फिरावे लागले. – बजरंग शिंदे, सभासद