रत्नागिरी : जिल्ह्यात 15 गावांना टँकरने पाणीपुरवठा | पुढारी

रत्नागिरी : जिल्ह्यात 15 गावांना टँकरने पाणीपुरवठा

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली असून सध्या तीन तालुक्यातील 15 गावातील 19 वाड्यांमधील 1 हजार 803 लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित सहा तालुक्यात अजुनही टँकर सुरू झालेला नाही.

लांबलेला मोसमी पाऊस, अधुनमधून अवकाळीची हजेरी यामुळे यंदा जिल्ह्यातील भूजल पातळी मोठी घट झालेली नव्हती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तीव्र असला तरीही टंचाईच्या झळा कमी बसतील असा अंदाज भूजल तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. अनेक नद्या, नाल्यांच्या पात्रात पाणी वाहते आहे. त्यामुळे किनार्‍यावरील विहिरींची पाणीपातळी खाली गेलेली नाही. परिणामी एप्रिल महिना अर्धा झाला तरीही टँकरने पाणी पुरवठा केल्या जाणार्‍या वाड्यांची संख्या कमी आहे. नऊपैकी तिन तालुक्यात 4 टँकरने पाणी मागवले जात आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘हर घर नल से जल’ संकल्पना अस्तित्त्वात आणली जात आहे.

जिल्ह्यात काही गावांमध्ये कामांना सुरुवात झाली आहे. त्यांचा समावेश टंचाईग्रस्तांमध्ये केलेला नाही. जलस्वराज्य टप्पा-2 मधून दहा वाड्यांमध्ये पाऊस, पाणी संकलन टाकी उभारली आहे. गावाच्या एका बाजूला डोंगराळ भागात वसलेल्या या वाड्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. ती गावे टंचाईतून कमी झाली.

Back to top button