कोल्हापूर : छ. शाहू स्मृती शताब्दीनिमित्त उद्यापासून ‘गुजरी सुवर्ण जत्रा’ | पुढारी

कोल्हापूर : छ. शाहू स्मृती शताब्दीनिमित्त उद्यापासून ‘गुजरी सुवर्ण जत्रा’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा सराफ व्यवसायाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी परराज्यातील सराफी व्यावसायिकांना कोल्हापुरात आश्रय देऊन गुजरी निर्माण केली. आज या गुजरीत शेकडो व्यावसायिक विविध व्यवसाय करीत असून यावर हजारो लोकांचा उदरनिर्वाह होत आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या स्मृती-शताब्दीनिमित्त ‘गुजरी सुवर्ण जत्रे’चे आयोजन केले आहे. शुक्रवार (दि. 22) ते रविवार (दि. 24 ) या कालावधीत गुजरी येथे सुवर्ण जत्रा होणार आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याअंतर्गत गुजरी येथे होणार्‍या जत्रेमध्ये सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत सराफी दुकाने सुरू असतील. यामध्ये पारंपरिक साज, ठुशी, बुगडी, टीक, राणीहार, चिताक, शिंदेशाही तोडे अशा दागिन्यांबरोबरच देशभरातील सोने-चांदीचे दागिने खरेदीची ग्राहकांना पर्वणी आहे. प्रत्येक दुकान दिवाळीप्रमाणे सजविण्यात येईल. सराफी पेढ्यांसमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. सेलिब—ेटीही या जत्रेला भेट देणार आहेत. तीन दिवस वाहतूक बंद राहणार असून गुजरी परिसरात पाणपोई, सरबत, खाऊ गल्लीचीही व्यवस्था केली जाणार
आहे.

दररोज 100 ग्राहकांना भेटवस्तू

या जत्रेत राजर्षी शाहूंच्या 100 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दररोज 100 ग्राहकांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. मजुरीमध्ये भरघोस सूटही असणार आहे. शिवाय खरेदीवर डिस्काऊंट कूपनही मिळेल. ग्राहक व पर्यटकांनी या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल व तेजस धडाम यांनी केले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button