नाशिक : गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का अधिक जलसाठा; मात्र जलसाठ्याचा योग्य विनियोग हवा | पुढारी

नाशिक : गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का अधिक जलसाठा; मात्र जलसाठ्याचा योग्य विनियोग हवा

नाशिक (मालेगाव) पुढारी वृत्तसेवा : सलग दोन वर्षे समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने अपवाद वगळता, जिल्ह्यातील सर्वच धरणे जलसंपन्न होऊन गतवर्षीपेक्षा एक टक्का जलसाठा त्यात आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने पाणी वापर संस्थांसह नदी काठावरील पाणीपुरवठा योजनांची मागणी लक्षात घेता, धरणांमधून निर्धारित आवर्तने सोडली जात आहेत. त्यानंतरही 18 एप्रिलपर्यंत सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी 44 टक्के जलसाठा कायम आहे. येत्या हंगामातही पर्जन्य सरासरी गाठणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला, तरी आहे त्या जलसाठ्यांचा योग्य प्रकारे विनियोग करण्याची आवश्यकता आहे.

नाशिक जिल्ह्यात लहान-मोठे 24 प्रकल्प आहेत. त्यांची एकूण जलधारण क्षमता 65 हजार 664 दलघफू एवढी आहे. त्यापैकी सध्या 28 हजार 820 दलघफू एवढे पाणी शिल्लक आहे. गतवर्षी 30 ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पांमध्ये सरासरी 96 टक्के जलसाठा झाला होता. तेव्हा ओझरखेड (88), मुकणे (75), भोजापूर (58) या चार धरणांचा अपवाद वगळता सर्वच धरणे भरली होती. जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरणही (18,500 दलघफू) ओव्हरफ्लो होऊन इतिहास घडला होता. सध्या या प्रकल्पात 8,575 दलघफू पाणी शिल्लक आहे. चणकापूर धरणाचा जलस्तरही 44 टक्क्यांवर (1,062 दलघफू) आला आहे.

तळवाडे बंधारा भरणार
गिरणा काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी चणकापूर धरणातून गत आठवड्यात पाणी सोडण्यात आले. ते ठेंगोडा बंधार्‍यावरील पाटचारीने मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण बंधार्‍यात पोहोचलेे. 87 दलघफू क्षमतेचा हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यास ओव्हरफ्लोच्या पाण्याने दाभाडीचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होते. एकदा पूर्ण क्षमतेने हा बंधारा भरल्यास, गिरणा धरण पाणीपुरवठा योजनेशी ताळमेळ घालत मालेगावला किमान तीन महिने पाणीपुरवठा शक्य होतो.

हेही वाचा:

Back to top button