नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी उद्या अखेरची संधी | पुढारी

नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी उद्या अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन लॉटरी जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. सोमवारी (दि.18) सायंकाळपर्यंत संपूर्ण राज्यात अवघे 20 हजार 663 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. लॉटरीच्या प्रवेश यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत बुधवारी (दि.20) संपणार आहे. मात्र, अद्यापही 80 टक्के जागा रिक्त असून, केवळ 20 टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहे. त्यामुळे लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास आरटीईची प्रवेशप्रक्रिया अजून लांबणार आहे.

आरटीई कायद्यानुसार राज्यात 9 हजार 86 शाळांमध्ये खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश दिला जात आहे. 1 लाख 1 हजार 947 जागांसाठी 2 लाख 82 हजार 783 पालकांनी अर्ज केले होते. त्यापैकी लॉटरी प्रक्रियेत 90 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दि. 5 एप्रिलपासून प्रवेश यादीतील प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्यास प्रारंभ झाला असून, प्रवेशाची अंतिम मुदत 20 एप्रिल आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 20 हजार 663 जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. तर एकट्या नाशिक जिल्ह्यात अवघ्या 670 विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे.

दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातील 422 शाळा पात्र ठरल्या होत्या. 4 हजार 927 जागांसाठी 16 हजार 566 पालकांनी अर्ज भरले होते. उपलब्ध जागा कमी आणि अर्जांची संख्या जास्त असल्याने लॉटरीकडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्ष लॉटरीमध्ये 4,513 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. उर्वरित 414 जागांबाबत निर्णय न झाल्याने पालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरटीईच्या अधिकृत पोर्टलवरही माहिती देण्यात न आल्याने पुरता गोंधळ उडाला आहे तर आरटीईची प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

‘आरटीई’ प्रवेशाची स्थिती
शाळा……………………9,086
उपलब्ध जागा……….1,01,906
प्राप्त अर्ज……………..2,82,783
लॉटरी निवड…………90,685
प्रवेश निश्चित………… 20,663

हेही वाचा:

Back to top button