धुळ्याच्या मधुर फूड्सच्या आगीवर आठ तासांनंतर नियंत्रण; कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान | पुढारी

धुळ्याच्या मधुर फूड्सच्या आगीवर आठ तासांनंतर नियंत्रण; कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान

धुळे : पुढारी वृत्तसेवा :  धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील मधुर फूड्स ॲण्ड ऑइल कंपनीमध्ये लागलेली आग तब्बल आठ तासांमध्ये आटोक्यात आणण्यात यश आले आहे. रविवारी (दि.१७) लागलेली आग शमविण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्वरित पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतरही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.

औद्योगिक वसाहतीतील मधुर फूड्स कंपनीच्या बारदानाच्या गोदामामधून धुराचे लोट येऊ लागल्याने कामगारांनी कंपनीच्या अन्य गोदामामधील कामगारांनादेखील मदतीसाठी बाेलवले. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या गोदामाजवळ मदतकार्य सुरू केले. परंतु तोपर्यंत आगीचे लोळ गोदामातून बाहेर पडू लागले हाेते. कच्च्या मालाचा गोदाम तसेच सरकी गोदाम आणि तेलाचा साठा ठेवलेल्या गोदामापर्यंत आगीचे लोळ जाऊन पोहोचले होते. याबाबत तातडीने मोहाडी पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पथकासह पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आल्याने धुळेसह शिरपूर, दोंडाईचा, अमळनेर आणि मालेगाव येथील अग्निशमन दलाचे बंब धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये दाखल झाले.

अग्निशमनच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तब्बल आठ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. मध्यरात्रीनंतर आग विझवण्यात यश आल्यानंतर रविवारी (दि.१७) सकाळपासून गोदामातून पुन्हा आग धुमसत असल्याचे लक्षात आल्याने अग्निशमन दलाने पाण्याचा मारा केला. त्यामुळे सुमारे १०० पेक्षा जास्त फेऱ्या मारल्यानंतर आग संपूर्णत: विझवण्यात यश आले. या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे संचालकांनी सांगितले आहे.

हेही वाचा

Back to top button