नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील मनसेतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घालत मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय मंत्री शहा यांना पत्र पाठविले आहे. संविधानाच्या कलम २५ ते २८ मध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याचा व त्याप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, तसे करताना इतर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेण्याचे घटनेत अभिप्रेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेवरील निकालात मशिदींवरील भोंग्यांमधून उच्चस्वरात करण्यात येत असलेल्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असून, प्रत्येक भारतीयाला घटनेने कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत असल्याने मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे संपूर्ण देशात पालन होणे अपेक्षित असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरविण्यात येणार नसल्याचे वक्तव्य करीत राज्यातील पोलिस सज्ज असल्याचा दिलेला इशारा हा सर्वोच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील निकालाचे स्पष्ट उल्लंघन आहे. मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याबाबत आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेत मशिदींवरील भोंगे तत्काळ उतरविण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.